इराणमध्ये सध्या सरकारविरोधी निदर्शनांची एक नवी लाट आली आहे. हे अभिनव आंदोलन चक्क सूर-ताल आणि नृत्याद्वारे केले जात आहे. त्याचा प्रभाव इराणमध्ये सर्वदूर वाढत चालला आहे. त्या विषयी…

‘आनंदसाठीची मोहीम’ म्हणजे काय?

टाळ्यांचा ताल, नृत्य अन् ‘ओह, ओह, ओह’ अशा समूह स्वरात आणि तालात सुरू असलेले लोकगीत गायन…अशा अभिनव आंदोलनाचे लोण सध्या इराणभर पसरले आहे. इराणच्या विविध शहरांत, आबालवृद्ध कंबरेस झटके देत, हवेत लयबद्ध हात फिरवत गाण्याच्या ओळी गात आहेत. तशा अनेक ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहेत. ‘बीबीसी पर्शियन’सारख्या वृत्तवाहिन्यांवरही हा अभिनव आंदोलन प्रकार प्रसारित झाला आहे. याबाबत इराणी नागरिकांच्या प्रतिक्रियाही ऐकायला मिळत आहेत. ते या आंदोलनास ‘आनंदसाठीची मोहीम’ संबोधत आहेत.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?

हे नृत्य-गीत आंदोलन कशासाठी?

लोक रस्त्यावर, दुकानात, क्रीडा संकुलात, महाविद्यालयीन वर्गांमध्ये, व्यापारी संकुलांत (मॉल), उपाहारगृहांत, व्यायामशाळांमध्ये, पार्ट्यांत आणि अन्यत्र कोठेही एकत्र येऊन अशी नाच-गाणी करत आहेत. तेहरानमध्ये गाण्यावर उत्स्फूर्त नृत्य आंदोलनामुळे एका प्रमुख महामार्गावर बोगद्यात ठप्प पडलेल्या वाहतुकीच्या चित्रफिती प्रसृत झाल्या होत्या. उद्यानांत डोक्यावर हिजाब परिधान न करता केस मोकळे सोडून तरुणींनी नृत्य केल्याचे दिसत आहे. तरुणांनी काही ठिकाणी सुबद्ध ‘हिप-हॉप’ नृत्यप्रकार सादर केले. या आंदोलनाद्वारे इराणच्या सरकारला एक ठाम इशाराच आंदोलक देऊ पाहत आहेत. ३२ वर्षीय ‘डीजे सोनामी’ या टोपणनावाने ओळखले जाणारे मोहम्मद अघापोर यांनी सांगितले, की देशातील सद्य:स्थितीचा निषेध करून आपले स्वातंत्र्य आणि आनंद परत मिळावे, ही मागणी करण्याचा हाही एक मार्ग आहे.

हेही वाचा : विश्लेषण: हूथी बंडखोरांमुळे महागाईचा भडका?

इराण सरकारची भूमिका काय?

इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी विशेषत: स्त्रियांना, तसेच स्त्री-पुरुष एकत्र समूह नृत्य करण्यास मनाई आहे. आंदोलक या नियमाचा सर्रास भंग करत आहेत. मात्र, सरकारही मनमानीपणे कधीही या नियमानुसार कारवाई करते. वाद्यसंगीत, नृत्य-गायन हे कलाप्रकार इराणी संस्कृतीत खोलवर रुजलेले आहेत. इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर इस्लामिक धर्मगुरूंच्या ४३ वर्षांच्या राजवटीत या कलाप्रकारांचा प्रभाव हटवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आले. पण ते आतापर्यंत अयशस्वी ठरले. अनेक शतकांपासून पर्शियन भाषा-साहित्यातही नृत्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अरबी ‘रक़्स’ शब्दाच्या जागी इस्लामी राजवटीत ‘सुनियोजित चळवळ’ हा शब्दप्रयोग सुरू झाला.

या आंदोलनास प्रारंभ कसा झाला?

एखादे गाणे आणि नृत्य हे अपवादानेच सविनय कायदेभंगासाठी सामूहिक साधन बनते. यंदा नोव्हेंबरअखेरीस इराणच्या उत्तर भागातील रश्त शहरातील मासळी बाजारात एका वृद्ध माणसाने हे अभिनव आंदोलन सुरू केले. ७० वर्षीय सदेघ बाना मोतेजादेद यांचे या बाजारात छोटे दुकान आहे. मोतेजादेद यांनी सरकारविरोधात जोशात उड्या मारत, डोलत नृत्य आंदोलन केले. त्यांचे नृत्य पाहण्यासाठी गर्दी जमली होती. त्यांनी त्यात सहभागी होण्याची साद या गर्दीला घातल्यानंतर पुरुषांचा एक छोटा गट त्यात सहभागी झाला. या प्रकारानंतर पोलिसांनी दडपशाही सुरू केली. रश्तमधील पोलिसांनी या नृत्यात सहभागी १२ पुरुषांच्या गटाला अटक केल्याचे ७ डिसेंबर रोजी जाहीर केले.

हेही वाचा : करोनाचा नवा जेएन-१ उपप्रकार काय आहे? जाणून घ्या सविस्तर

सरकारी दडपशाही कशी सुरू आहे?

या नृत्याची चित्रफीत असलेली ‘इन्स्टाग्राम’ची पृष्ठे सरकारने हटवली असून, अनेक संकेतस्थळांवरून या ध्वनिचित्रफिती हटवल्याचे पोलिसांनी जाहीर केले. बाना मोतेजादेद यांच्या ‘इन्स्टाग्राम’ पृष्ठावर त्यांचे सुमारे एक लाख २८ हजार नागरिक अनुसरण (फॉलो) करत होते. त्यांच्या सर्व ‘पोस्ट’ हटवल्या. त्यांच्या खात्यावर ‘प्रोफाइल’ चित्राच्या जागी न्यायव्यवस्थेचे प्रतीकचिन्ह प्रसिद्ध केले असून, त्या सोबत ‘गुन्हेगारी’ आशयाच्या मजकूर-चित्रफितींमुळे हे पृष्ठ बंद केले गेल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हे कृत्य करणाऱ्याची चौकशी करण्यात येत असल्याचेही नमूद केले आहे. मोतेजादेद यांच्या निकटवर्तीयाने सांगितले, की ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’च्या गुप्तचर कार्यालयाने या नृत्य-गायनात सहभागी व्यक्तींना बोलावून त्यांची अनेक तास चौकशी केली. डोळे बांधून मारहाण केली. कायदेशीर कारवाईची धमकी दिली गेली. पुन्हा कधीही सार्वजनिक ठिकाणी नृत्य-गीत न करण्याच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले. मोतेजादेद यांना अनेक तास ताब्यात ठेवले. त्यांच्यावर सरकारविरुद्ध असंतोष भडकावल्याचा आरोप ठेवला. पोलिसांनी रश्तमधील रस्त्यांवर संगीत सादर करणाऱ्यांवर छापे टाकून त्यांची वाद्ये जप्त केली. या कारवाईची बातमी इराणमध्ये वणव्यासारखी पसरून असंतोषात भरच पडली.

हेही वाचा : विश्लेषण : ईडीकडून केजरीवालांना पुन्हा समन्स, त्यांनी येण्यास परत नकार दिला तर?

दडपशाहीविरुद्ध प्रतिक्रिया काय आहे?

समाजमाध्यमांवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सरकारने आनंदाविरुद्ध युद्धच पुकारल्याचा आरोप केला आहे. साध्या व्यवहारज्ञानाचाही सरकारकडे अभाव असल्याची टीका होत आहे. नागरिक सामूहिक नाच-गाणी करत असल्याच्या चित्रफिती ‘व्हॉट्स ॲप’द्वारे सर्वदूर प्रसारित होत आहेत. ‘डीजे सोनामी’ अघापोर यांच्या ‘इन्स्टाग्राम’वरील पृष्ठावर नृत्य-गीताची ‘रीमिक्स’ ध्वनिचित्रफीत १ डिसेंबरपासून आठ कोटी नागरिकांनी पाहिली. वृत्तपत्रांनी सरकारच्या तारतम्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारकडूनच नियमांच्या बेबंद उल्लंघनाने हे आंदोलन चिघळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. समाजशास्त्रज्ञ मोहम्मद फाझेली यांनी स्वत: ओढवून घेतलेल्या आपत्तीमुळे सरकारचाच पराभव होणार असल्याचे नमूद केले आहे.

abhay.joshi@expressindia.com