देशात एप्रिल महिन्यात घरी बनविलेली मांसाहारी थाळी स्वस्त आणि शाकाहारी थाळी महागल्याचे समोर आले आहे. ‘क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्स’ संस्थेने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे.

नेमका अहवाल काय?

‘क्रिसिल’ने नुकताच एप्रिल महिन्यासाठीचा ‘रोटी राइस रेट’ अहवाल जाहीर केला. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यात शाकाहारी थाळीचा दर ८ टक्क्यांनी वाढला. याच वेळी मांसाहारी थाळीचा दर ४ टक्क्यांनी कमी झाला. एप्रिलमध्ये शाकाहारी थाळीची किंमत २७.४ रुपयांवर पोहोचली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात शाकाहारी थाळी २५.४ रुपयांना होती. याच वेळी मांसाहारी थाळीची किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी कमी होऊन ५६.३ रुपयांवर घसरली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मांसाहारी थाळी ५८.९ रुपयांना होती.

थाळीमध्ये नेमके काय?

शाकाहारी थाळीमध्ये चपाती, कांदा, टोमॅटो, बटाटा, भात, डाळ, दही आणि तोंडी लावण्याचे पदार्थ यांचा समावेश आहे. मांसाहारी थाळीमध्ये शाकाहारी थाळीप्रमाणचे पदार्थ असून, त्यात डाळीऐवजी चिकन अथवा इतर मांसाचा समावेश असतो. घरी बनविलेल्या थाळीची सरासरी किंमत ही त्यातील पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालावर अवलंबून असते. त्यात मासिक पातळीवर होणारा बदल सामान्य नागरिकांच्या खर्चात वाढ अथवा बचत करणारा ठरतो. त्यामुळे भाज्या अथवा चिकन, मटण महागल्यास सामान्य नागरिकांचा खर्च वाढून थाळीची किंमतही वाढते. याचबरोबर स्वयंपाकाच्या गॅससह इतर अनेक घटकही या किमतीवर परिणाम करणारे ठरतात.

हेही वाचा >>> अमेरिकेत आशियाई वंशाच्या नागरिकांविरुद्ध द्वेष वाढत आहे का? सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

किमतीत बदल कशामुळे?

देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात भाज्यांचे भाव वाढले. त्यात कांद्याचे भाव ४१ टक्के, टोमॅटोचे भाव ४० आणि बटाट्याचे भाव ३८ टक्के वाढले. रबी हंगामातील कमी लागवडीचे क्षेत्र असल्याने कांद्याची आवक कमी झाल्याने भाव वाढले. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये बटाटा पिकाचे नुकसान झाल्याने त्याचे भाव वाढले. शाकाहारी थाळीच्या किमतीत भाताच्या किमतीचा वाटा १३ टक्के आणि डाळींच्या किमतीचा वाटा ९ टक्के असतो. एप्रिलमध्ये तांदूळ आणि डाळींच्या किमतीत अनुक्रमे १४ व २० टक्के वाढ झाली आहे. मात्र, जिरे, मिरची, वनस्पती तेल यांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे ४० टक्के, ३१ टक्के आणि १० टक्के घट झाली आहे. यामुळे शाकाहारी थाळीच्या किमतीतील वाढ काही प्रमाणात रोखली गेली आहे. मांसाहारी थाळीच्या किमतीत घट होण्यामागे प्रामुख्याने ब्रॉयलर चिकनच्या दरात झालेली घट कारणीभूत ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये ब्रॉयलर चिकनचे दर १२ टक्क्यांनी कमी झाले.

मार्चच्या तुलनेत काय परिस्थिती?

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यात शाकाहारी थाळी महागली आणि मांसाहारी थाळी स्वस्त झाल्याचे दिसत असले तरी यंदाच्या मार्च महिन्याचा विचार करता वेगळे चित्र दिसत आहे. शाकाहारी थाळीची किंमत मार्च महिन्यात २७.३ रुपये होती. त्यात फारशी वाढ न होता एप्रिलमध्ये या थाळीची किंमत २७.४ रुपये झाली. कांद्याची नवीन आवक झाल्याने भावातील ४ टक्के घसरण आणि इंधन दरातील २ टक्के घसरण यासाठी कारणीभूत आहे. मांसाहारी थाळीची किंमत मार्च महिन्यात ५४.९ रुपये होती. ती एप्रिलमध्ये वाढून ५६.३ रुपयांवर पोहोचली. जास्त मागणीमुळे ब्रॉयलरच्या किमतीत ४ टक्के वाढ झाली आहे. यामुळे मांसाहारी थाळीची किंमत मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये महागली.

हेही वाचा >>> भाजपाच्या प्रचारातून पूर्णपणे गायब असलेल्या स्मार्ट सिटी मिशनची सध्या काय अवस्था आहे?

भविष्यातील चित्र काय?

भाज्यांचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. त्यात बटाटा, आले आणि इतर भाज्यांचे भाव वाढत आहेत. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे. यामुळे आगामी काळात त्याचा भाज्यांच्या भावावर परिणाम होणार आहे. यामुळे सरकारला यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. रिझर्व्ह बँकेचे किरकोळ महागाई दराचे उद्दिष्ट ४ टक्के असून, ते गाठण्यासाठी मोसमी पावसावर मदार असणार आहे. मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर ४.८५ टक्के होता. तो एप्रिलमध्ये वाढून ५.०९ टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे मासिक पातळीवर विचार करता ही वाढ थाळीच्या किमतीतही दिसून येत आहे.

sanjay.jadhav@expressindia.com