पदवी ही आता क्षमता मोजण्याचा अंतिम मापदंड राहिलेली नाही. आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये पदवी घेणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांपेक्षाही आता आयआयटी ड्रॉपआऊट पण वेगळा विचार करणाऱ्या, स्वतःची वेगळी वाट चोखाळणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपन्या प्राधान्य देऊ लागल्या आहेत.
आयआयटीच्या प्रवेश परीक्षेचे महत्त्व
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था या भारताच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या संस्था आहेत. आयआयटीत उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते. त्यामुळे आयआयटीतील प्रवेश म्हणजे उत्कृष्ट करिअर, गलेलठ्ठ पगाराची नोकरी, बहुतांश परदेशी नोकरी आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या सोनेरी, सुखासीन आयुष्याचे सोनेरी तिकिट मानले जाते. त्यामुळे भारताच्या शैक्षणिक यशाच्या पारंपरिक चौकटीत आयआयटीची प्रवेश परीक्षा हा मैलाचा दगड मानला जातो. ही केवळ एक परीक्षा नाही तर एक राष्ट्रीय ध्यास आहे. यशस्वी इंजिनीअर व्हायचे आहे म्हणजे आयआयटी प्रवेशाशिवाय ते होणे नाही, असे जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याचे आणि विशेषतः पालकांचे म्हणणे असते. पण आता एआयसारख्या अति अद्ययावत तंत्रज्ञानाच्या जमान्यात या मानसिकतेत बदल होत आहे.
ड्रॉपआऊट विद्यार्थ्यांना महत्त्व?
भारताच्या स्टार्टअप इको सिस्टिममध्ये एक अनपेक्षित वळण आले आहे मोठ्या संख्येने कंपन्यांचे संस्थापक आणि टेक लीडर्स पारंपरिक हुशार विद्यार्थ्यांपेक्षा जे अशा संस्थांमधून (आयआयटी) बाहेर पडले अशांना पाठिंबा देत आहेत. आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून बाहेर पडणे हे आता अपयश मानले जात नाही, तर एक सन्मानाचा नवा आयाम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. स्वतःची वाट निवडणे, काहीतरी आणखी चांगलं निवडण्यासाठी जे हातात आहे ते बाजूला ठेवण्याची तयारी असणे याकडे सन्मानाने पाहिले जात आहे.
एआय स्टार्टअप्सना काय वाटते?
एआय स्टार्टअप्सच्या एका संस्थापकाने थेट सांगितलं की ते निवड करायची झाल्यास एखाद्या आयआयटी टॉपर विद्यार्थ्यापेक्षा कधीही एका हुशार आयआयटी ड्रॉपआऊट विद्यार्थ्याला प्राधान्य देतील. कारण त्यांच्या मते, एका इतक्या मोठ्या, प्रतिष्ठित संस्थेतून बाहेर पडण्याचा निर्णय दुर्मीळ असतो. अशा विद्यार्थ्याला ठरवून ठेवलेला हमखास यशाचा मार्ग न चोखळता स्वतःचा नवा मार्ग तयार करण्याची भूक असते. एआयसारख्या गोंधळलेल्या आणि झपाट्याने बदलणाऱ्या क्षेत्रात ह्याच गुणांची सर्वाधिक गरज आहे, असे कंपन्यांच्या संस्थापकांना वाटत आहे. एलएचआर ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ अंकुर अग्रवाल यांनी एक अनुभव सांगितला. ते म्हणाले, ‘भारतीय एआय स्टार्टअपने नुकतेच दहा कोटी डॉलर्सचे फंडिंग मिळवले होते. त्यांच्या संस्थापकांशी झालेल्या चर्चेत मी त्यांना आयआयटीचे टॉप संगणक अभियांत्रिकी पदवीधर सुचवले. पण त्यांनी उत्तर दिलं — ‘खरं सांगायचे तर आम्हाला ड्रॉपआऊट्स अधिक योग्य वाटतात. एवढ्या उच्च दर्जाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीला सर्वाधिक पात्र उमेदवार नकोत हे बघून मी गोंधळलो. त्यावर त्या संस्थापकाने स्पष्ट केले की आम्ही अशा क्षेत्रात काम करत आहोत, जेथे अनेक गोष्टी अजून धुंडाळायच्या आहेत. त्यामुळे त्यासाठी आम्हाला अशा लोकांची गरज आहे, जे वेगळा विचार करतात. पदवीच्या समाजमान्य ठरवून दिलेल्या रस्त्याने जाऊन आपल्याला हवे ते मिळत नाही. तो मार्ग सोडून वेगळे शिकण्याचे धाडस करणाऱ्या या विद्यार्थ्यांची आम्हाला गरज आहे.
परदेशातही हाच विचारप्रवाह
ही प्रवृत्ती केवळ भारतातच नाही. कॉलेज ड्रॉपआऊट्सच्या कथा जगभर पसरल्या आहेत — स्टीव्ह जॉब्स (रीड), मार्क झकरबर्ग (हार्वर्ड), आणि इलॉन मस्क (स्टॅनफर्ड) — हे आता उद्योजकतेचे प्रतीक आहेत. सॅनफ्रान्सिस्कोतील अनेक एआय आणि आघाडीच्या टेक स्टार्टअप्समध्ये हेच चित्र दिसत आहे. त्यांना पदवी महत्त्वाची वाटतेही, कारण तिथे मूलभूत ज्ञान मिळते. पण त्यांना स्वतः दिशा ठरवण्याच्या क्षमतेकडे — म्हणजेच अनिश्चिततेतून मार्ग शोधण्याच्या वृत्तीच्या दिशेने जाण्याचे आकर्षण अधिक असते.
आयआयटीची पदवी निरुपयोगी?
आयआयटीची पदवी आता निरुपयोगी झाली आहे, असा याचा अर्थ नाही. बँकिंग, कन्सल्टिंग किंवा पारंपरिक तंत्रज्ञान क्षेत्रांत अजूनही तिची प्रतिष्ठा टिकून आहे. परंतु पदवी ही आता क्षमता मोजण्याचा अंतिम मापदंड राहिलेली नाही. एआय, क्रिप्टो किंवा डीप टेकसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांत कामगिरी पदवीपेक्षा मोठी ठरत आहे. या क्षेत्रांतील ज्ञान महिनाभरात कालबाह्य होतं. जो पटकन शिकतो, त्वरित जुळवून घेतो आणि जे चालत नाही ते मोडून नव्याने घडवतो, तोच यशस्वी होतो. ही कौशल्ये वर्गात शिकवली जात नाहीत; ती प्रयोग, अपयश आणि समस्या सोडवण्याच्या सततच्या प्रयत्नांतून घडतात. आयआयटीसारखी पदवी सोडणं म्हणजे आराम आणि प्रतिष्ठेच्या निश्चित वाटेपासून दूर जाणं. पण काहींना ती वाट खूप अरुंद वाटते. वर्गातली शिकवणी, अभ्यासक्रम मर्यादित वाटू लागतो. त्यांना महाविद्यालयाच्या बाहेर कोवर्किंग स्पेसेसमध्ये चालणाऱ्या गोष्टी, रात्रीची कोडिंग सत्रे, अपूर्ण प्रोटोटाइप्स आणि स्टार्टअप पिचिंगमध्ये अधिक रस वाटू लागतो आणि पदवीची वाट हळूहळू मागे पडते.