Silvio Berlusconi Passes Away : इटलीचे माजी पंतप्रधान व अब्जाधीश, माध्यम सम्राट सिल्व्हिओ बर्लुस्कोनी यांचे सोमवारी निधन झाले. इटलीचे नऊ वर्षे पंतप्रधानपद भूषविलेल्या बर्लुस्कोनी यांची कारकीर्द वादग्रस्त अशी ठरली. भ्रष्टाचार आणि ऐषोरामाच्या जीवनशैलीमुळे त्यांच्यावर अनेकदा टीका झाली, तसेच इटलीच्या समाजमनावरही त्यांचा दशकभर पगडा होता. गेल्या काही वर्षांपासून ते हृदयविकार आणि कर्करोगाने ग्रस्त होते. एकदा त्यांनी स्वतःला “राजकारणातील जिसस क्राइस्ट…” असे संबोधले होते. अब्जाधीश आणि माध्यम सम्राट बर्लुस्कोनी यांनी इटलीच्या इतिहासात सर्वाधिक काल पंतप्रधानपद भूषविण्याचा विक्रम केला आहे.

बर्लुस्कोनी यांच्या निधनाचे वृत्त सार्वजनिक झाल्यानंतर इटलीच्या विद्यमान पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शोक व्यक्त करताना म्हटले, “इटलीच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून बर्लुस्कोनी यांचा उल्लेख होतो.” तीन वेळा त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली, नऊ वर्षे त्यांनी हे पद भूषविले. हुकूमशहा मुसोलिनी यांच्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा विक्रम त्यांनी केला. काही वर्षांपूर्वी त्यांनी सार्वजनिक जीवनातून माघार घेतली असली तरी फोर्जा इटालिया या पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. मेलोनी यांच्या सरकारला फोर्जा इटालिया पक्षाने पाठिंबा दिलेला आहे.

Prithviraj Chavan, pm modi,
“..तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकांची ठरली असती”; पृथ्वीराज चव्हाणांचे पंतप्रधानांवर टीकास्र
chhota rajan still alive
दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अद्याप जिवंत, ९ वर्षांनी छोटा राजनचा फोटो आला समोर
lokmanas
लोकमानस: मोदींचे ‘गेमिंग’बद्दलचे मत धक्कादायक
President Erdogan of Turkey
तुर्कस्तानात धर्मवादी राजकारणाला शहरी मतदारांनी नाकारले? अध्यक्ष एर्दोगान यांच्या पक्षाला स्थानिक निवडणुकांत अपयश कशामुळे?

बर्लुस्कोनी यांच्या आयुष्याचा प्रवास स्वप्नवत असा होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व ट्रम्प यांच्यासारखे होते, फरक एवढाच की ते ट्रम्प यांच्याआधी राजकारणात उतरले होते. देशभरात पसरलेल्या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून बर्लुस्कोनी यांनी स्वतःचा प्रभाव निर्माण केला होता. व्यावसायिक टीव्ही क्षेत्रात त्यांनी आपला दबदबा तयार केला होता. तसेच एकदा एसी मिलान फुटबॉल क्लबची मालकीही त्यांच्याकडे होती. इटलीचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून दशकभर त्यांचा उल्लेख होत होता, तसेच बातम्यांमध्येही ते नेहमीच व्यापलेले असायचे. अर्थातच चुकीच्या कामांसाठी.

हे वाचा >> इटलीत नव-फॅसिस्ट विचाराचे सरकार

कोण होते सिल्व्हिओ बर्लुस्कोनी?

बर्लुस्कोनी यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३६ रोजी मिलानमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवले. मिलान विमानतळाच्या जवळ मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी त्यांनी अनेक गृहनिर्माण प्रकल्प उभारले. अब्जाधीश होण्याचा त्यांचा प्रवास इथून सुरू झाला. ‘गार्डियन’ वृत्तपत्राने २००९ साली त्यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली होती. त्यात म्हटले की, मध्यमवर्गीय कुटुंबातील बँक मॅनेजर असलेल्या व्यक्तीचा मुलगा एवढ्या भव्य प्रकल्पासाठी निधी कसा जमवतो, कुठून जमवतो हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे.

१९७० च्या दशकात बर्लुस्कोनी यांनी स्वतःची खासगी टीव्ही वाहिनी सुरू केली. या माध्यमातून सरकारी वाहिन्यांची एकाधिकारशाही त्यांनी मोडीत काढत स्वतःला माध्यमसम्राट म्हणून पुढे आणले. १९९४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र त्यांच्या व्यवसायात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना अल्पावधीतच राजीनामा द्यावा लागला.

बुंगा, बुंगा पार्टी आणि वेश्या व्यवसायाचे प्रकरण

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बर्लुस्कोनी यांना अल्पवयीन वेश्याव्यवसाय प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोषत्व मिळाले. दशकभरापूर्वी याच प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले होते. मिलान शहराच्या बाहेरील भागात असलेल्या अरकोर येथील निवासस्थानी बर्लुस्कोनी पंतप्रधान असताना बुंगा, बुंगा पार्टी आयोजित करीत असत. या पार्टीत सहभागी झालेल्या साक्षीदारांना लाच दिल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता, त्यात त्यांची निर्दोष मुक्तता झाली. बुंगा बुंगा पार्टीमध्ये बर्लुस्कोनी यांचे जवळचे मित्र सहभागी होत असत. या पार्टीला ‘भव्य सेक्स पार्टी’ असे संबोधित केले जायचे. तरुण मॉडेल्स बर्लुस्कोनी यांच्यासाठी या पार्टीत स्ट्रिप डान्स करीत असत, अशी माहिती ‘फर्स्टपोस’ या वेबसाइटने दिली आहे.

हे वाचा >> इटलीचे माजी पंतप्रधान बर्लुस्कोनी यांना तुरुंगवास

याच पार्टीत १७ वर्षीय स्ट्रिपर, डान्सर करिमा हिला लैंगिक सुखाच्या बदल्यात पैसे दिल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. या घटनेचे साक्षीदार त्या पार्टीतील २४ पाहुणे होते. मात्र या पाहुण्यांनाही लाच देऊन साक्ष बदलण्यास भाग पाडले, असा बर्लुस्कोनी यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.

Karima-El-Mahroug
करीमा (Karima-El-Mahroug) – Photo – Reuters

‘द मिरर’ने दिलेल्या बातमीनुसार, बर्लुस्कोनी यांच्या विरोधातील खटल्यात ३३ महिलांनी ‘बुंगा बुंगा पार्टी’वरून त्यांच्यावर विविध आरोप केले होते. या पार्टीत या महिलांना राजकीय नेत्यांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात होते. त्यांनी या पार्टीचे वर्णनही केले. संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम असायचा, ज्यामध्ये इटलीच्या झेंड्याच्या रंगामध्ये लाल, पांढऱ्या आणि हिरव्या रंगात विविध खाद्यपदार्थ ठेवलेले असत. जेवण झाल्यानंतर बर्लुस्कोनी एक किंवा अधिक मॉडेलची शय्यासोबत करण्यासाठी निवड करायचे.

मोरोक्को देशाची मॉडेल इमेन फदील ही बर्लुस्कोनीच्या पार्ट्यांमध्ये नेहमी सहभागी असायची. २०१२ साली तिने पंतप्रधान बर्लुस्कोनी यांच्याविरोधात साक्ष नोंदविली. नर्सच्या वेशभूषेतील महिला बर्लुस्कोनी यांच्यासमोर स्ट्रिप डान्स करतात, असा आरोप तिने लावला होता. मात्र २०१९ साली आकस्मितरीत्या इमेन फदीलचा मृत्यू झाला. मिलानमधील हॉस्पिटलमध्ये तिने अखेरचा श्वास घेतला. इमेनवर विषप्रयोग झाला असल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला होता. इमेनप्रमाणेच करिमानेही पंतप्रधान बर्लुस्कोनी यांच्यावर ‘बुंगा बुंगा पार्टी’मधील बीभत्स प्रकारांबद्दल आरोप केले होते. रुबी या टोपणनावाने मी पार्टीत सहभागी व्हायचे. या पार्टीनंतर बर्लुस्कोनी मला ३,९०० डॉलर्स देत असत, अशी साक्ष तिने २०१३ साली दिल्याची माहिती, ‘एपी’ या वृत्तसंस्थेने दिली.

करिमाने न्यायालयात सांगितले की, पंतप्रधान बर्लुस्कोनी यांनी ‘बुंगा बुंगा पार्टी’ची संकल्पना त्यांनी त्यांचे मित्र गडाफी (लिबियाचे माजी हुकूमशहा) यांच्याकडून घेतली आहे. अशी माहिती स्वतः बर्लुस्कोनी यांनी तिला दिली होती. अल्पवयीन करिमाकडे पैशांच्या मोबदल्यात लैंगिक सुखाची मागणी केल्याबद्दल २०१३ साली न्यायालयाने पंतप्रधान बर्लुस्कोनी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र बर्लुस्कोनी यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आणि न्यायाधीशांनी संशयाच्या आधारावर त्यांची निर्दोष मुक्तता केली. बर्लुस्कोनी यांना तिचे वय माहीत नव्हते, असा आधार घेऊन त्यांची मुक्तता करण्यात आली.

अल्पवयीन मुलींशी संबंधावरून घटस्फोट

आणखी एका प्रकरणात बर्लुस्कोनी यांचे अल्पवयीन मुलींशी संबंध असल्याचे समोर आल्यानंतर बर्लुस्कोनी यांच्या द्वितीय पत्नी आणि अभिनेत्री वेरोनिका लारिया यांनी २००९ साली त्यांच्यापासून घटस्फोट घेतला. मॉडेल आणि अभिनेत्री नोएमी लेटिझा हिच्या अठराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत बर्लुस्कोनी सहभागी झाले होते. त्यावरून त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. पुढे नोएमी लेटिझा हिला बर्लुस्कोनी यांच्या वाहिनीमध्ये नोकरीही मिळाली होती. पण पंतप्रधान बर्लुस्कोनी यांनी या संबंधाबाबत कधी जाहीरपणे वाच्यता केली नाही.

prime minister Silvio Berlusconi and his wife Veronica Lario
पंतप्रधान बर्लुस्कोनी आणि त्यांच्या द्वितीय पत्नी आणि अभिनेत्री वेरोनिका लारिया

बर्लुस्कोनी यांच्यावर ३५ गुन्हे दाखल झाले

पंतप्रधान बर्लुस्कोनी यांच्यावर ३५ फौजदारी स्वरूपाचे खटले दाखल करण्यात आले होते, त्यापैकी फक्त एका खटल्यात त्यांच्यावर दोषारोप सिद्ध होऊ शकले. २०१२ साली एका चित्रपटाचे हक्क विकण्यात गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा त्यांच्यावर शाबीत झाला. ऑक्टोबर २०२१ साली त्यांना याप्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्यानंतर त्यात तीन वर्षांची कपातही केली गेली. इटलीमधील तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे २००६ साली कायद्यात सुधारणा करून शिक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. बर्लुस्कोनी यांनी शिक्षेचा एका वर्षाचा काळ घरातच अर्धवेळ समाजसेवा करून व्यतित केला. या काळात त्यांनी वृद्धांची सेवा केल्याचे सांगितले जाते. तसेच तीन वर्षे सार्वजनिक पदापासून दूर राहण्याचाही निकाल न्यायालयाने दिला होता.