Coffee and the Caste System दक्षिण भारतातील फिल्टर कॉफीचा थेट संबंध जातिव्यवस्थेशी जोडण्यात येत आहे. अहान ए स्वामी या डिजिटल क्रिएटरने दक्षिण भारतातील कॉफीचा संबंध भारतात अस्तित्त्वात असलेल्या क्रूर जातिव्यवस्थेशी जोडला आहे. त्यामुळे हा मुद्दा विशेष चर्चेत आला आहे. कॉफीचा वापर ब्रिटीशांनी केला, परंतु नंतर तमिळ ब्राह्मणांनी स्वतःचे श्रेष्ठत्त्व सिद्ध करण्यासाठी कॉफीचा स्वीकार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉफीचा संबंध जातिव्यवस्थेशी आहे का? आणि इतिहास नेमके काय सांगतो याचा घेतलेला हा आढावा.

अधिक वाचा: ३० वर्षांपूर्वीच झालं दोघांचही निधन, तरीही आज होतंय लग्न; काय आहे भारतातील भूतविवाहाची प्राचीन परंपरा?

कॉफीचा शोध कसा लागला?

कॉफीचा शोध इथिओपियामध्ये लागला. स्थानिक कथेनुसार काल्दी नावाचा धनगर कॉफीच्या शोधासाठी कारणीभूत ठरला होता. रश्मी वारंग यांच्या ‘जाणून घ्या कॉफीच्या शोधाची रंजक गोष्ट या लोकसत्ता मध्ये प्रकाशित झालेल्या सदरात कॉफीच्या जन्म वृतांताचा सविस्तर आढावा घेतला आहे. यात म्हटल्याप्रमाणे, ‘इथोपियाच्या एका गावी काल्दी नामक धनगर राहात होता. एके दिवशी धनगराच्या लक्षात आलं की आपल्या बकऱ्यांना विशिष्ट टेकड्यांवर चारलं की, त्या अधिकच उनाडतात, आनंदी वाटतात. रात्रभर झोपत नाहीत. म्हणून त्याने बकऱ्यांचा माग काढल्यावर त्याला एक महत्त्वाची गोष्ट आढळली, विशिष्ट प्रकारची लाल रंगाची छोटी फळं खाल्ल्याने असं होत आहे. याच गोष्टीच आश्चर्य वाटून तो ती फळं घेऊन जवळच्याच मठात गेला. तिथे प्रार्थना करणाऱ्या साधकांना त्याने ती फळं दाखवून आपलं निरीक्षण सांगितलं. सुरुवातीला त्या साधकांना हे ‘सैतानाचे काम’ वाटले. मात्र त्या फळांना उकळत्या पाण्यात टाकून त्यापासून बनवलेल्या पेयाच्या स्वादाने खूपच तरतरीत वाटते हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दीर्घकाळ प्रार्थनेसाठी बसणंही सोपं होतं. यातूनच कॉफीच्या फळांचा पेयपानासाठी वापर सुरू झाला.’पंधराव्या शतकाच्या आसपास कॉफी बिया अरबांकडे आल्या. येमेन प्रांतातील अरेबिया येथे कॉफीची रीतसर लागवड सुरू झाली. अरबांकडून युरोपियन खलाशी, प्रवासी यांच्यामार्फत कॉफी युरोपात गेली.’

कॉफी भारतात कशी आली?

प्रचलित माहितीनुसार भारतात कॉफीच्या लागवडीचे श्रेय बाबाबुदान या सुफी संताला दिले जाते. बाबाबुदान हे मक्का यात्रेला जात असताना येमेनमधील मोका प्रांतात त्यांचा मुक्काम होता. इथे त्यांना एक दाट, किंचित गोड, किंचित कडवट स्वादाचे पेय प्यायला मिळाले. तो स्वाद त्यांना इतका आवडला की, भारतातही हे पेय उपलब्ध व्हावं असं त्यांना वाटले. परंतु अरबांच्या कडक पहाऱ्यात कॉफी बिया सहज घेवून येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी कॉफीच्या सात बिया गुप्तपणे आपल्यासोबत आणल्या आणि कर्नाटक येथील चिकमंगळूरमधल्या टेकडीवर त्यांची लागवड केली.

कॉफी आणि ब्राह्मण समाज

डॉ डिंपल जांगडा (आयुर्वेदिक कोच आणि गट स्पेशालिस्ट) यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, कॉफीची ओळख भारतात झाल्यावर कॉफीची लागवड आणि कॉफी एक पेय म्हणून लवकरच भारताच्या इतर भागांमध्ये पसरली. किंबहुना, विक्री वाढवण्यासाठी चहाला पर्याय म्हणून ब्रिटिशांनी याचा प्रचार केला. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू यांसारख्या इतर प्रदेशांमध्ये त्याचा प्रसार होऊ लागला. सुरुवातीला ब्राह्मण समुदायाने चहाला पर्याय म्हणून कॉफीच्या कल्पनेला विरोध दर्शविला. ते कॉफीला अगदी निषिद्ध किंवा परदेशी वस्तू मानत. त्यांची पहिली पसंती चहाला होती. त्यानंतर लगेचच, फिल्टर कॉफी हे उच्चभ्रू लोकांचे पेय म्हणून स्वीकारले गेले आणि ब्राह्मण समाजही कॉफी पिण्याच्या संस्कृतीत सहभागी झाला; आणि लवकरच या व्यवसायाची क्षमता त्यांच्या लक्षात आली.

अधिक वाचा: स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

कॉफीचे भारतीयकरण

सुरुवातीच्या कालखंडात कॉफी फक्त युरोपात निर्यात केली जात होती. किंवा फक्त उच्च वर्गाला परवडणारी होती. सामान्य वर्गात कॉफी प्रसिद्ध झाली, त्याला कॉफीचे संस्कृतीकरण कारणीभूत होते. ब्राह्मण आणि इतर उच्च वर्गाने आपल्या रोजच्या खानपानात कॉफी समाविष्ट केल्यानंतर समाजाच्या निम्न वर्गातही कॉफी संस्कृती प्रचलित झाली.

तंजोरच्या गॅझेटियरने मजुरांच्या अन्न सेवनाच्या सवयींमधील बदलांबद्दल मनोरंजक माहिती प्रकाशित केली आहे. ब्राह्मण आणि इतर उच्च जातीचे लोक दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात गरम अन्न घेत, सकाळी कॉफी प्यायचे आणि दुपारी ३ वाजता हलका नाश्ता घेत होते. दुसरीकडे, निम्न जातीचे लोक, सकाळी ७:३० वाजता थंड भात आणि कांजी आहारात घेत, क्वचित प्रसंगी मांस सूप घेत असतं. दुपारच्या जेवणासाठी गरम किंवा थंड भात आणि रात्री ७ ते रात्री ८ च्या दरम्यान मांस सूप/करी भात खात. ‘अलीकडच्या काही वर्षांत, शुद्र वर्गात, अगदी गरीब वर्गातही, थंड भातापेक्षा सकाळी कॉफी घेण्याकडे कल वाढला आहे. तर दुसरीकडे उच्च वर्गात कॉफीतील रिफाईन साखरेच्या प्रमाणामुळे कल कमी होत होता. याचा संदर्भ १९१७ च्या तंजावर गॅझेटीअर मध्ये सापडतो.
दक्षिण भारतातील नाडर ख्रिश्चनांचे वर्गीकरण प्रामुख्याने निम्न जातींमध्ये होते; पारंपरिकरित्या ते ताडीच्या व्यवसायात होते जे नंतर ते काम सोडून कॉफीच्या व्यवसायकडे वळले.

कॉफी आणि जातिव्यवस्था

तमिळ ब्राह्मणी जातिव्यवस्थेविरुद्धच्या संघर्षात कॉफीची थेट भूमिका होती, मुख्यत: त्या काळातील ‘कॉफी हॉटेल्स’मध्ये पृथक्करणाची प्रथा होती. पेरियार, यांनी स्वाभिमान चळवळ सुरू केली आणि सध्या सत्तेत असलेल्या दोन द्रमुक पक्षांना जन्म दिला, ते कॉफी शॉप्सबद्दल लिहितात, कॉफी क्लबमध्ये निम्न जातीला वेगळे बसवले जाते. या गावात फिरलो तर अनेक पाट्या ‘हे ब्राह्मणांसाठी आहे’, ‘हे शूद्रांसाठी आहे’, ‘पंचम, मुस्लिम आणि ख्रिश्चनांना येथे अन्न, नाश्ता, पाणी दिले जाणार नाही’, ‘शुद्रांनी पाणी काढू नये’, असे फलक लावले आहेत. ‘इथे शुद्रांनी आंघोळ करू नये’, ‘शुद्रांना या शाळेत प्रवेश मिळणार नाही’, ‘शुद्रांनी हे विषय वाचू नयेत’, ‘फक्त ब्राह्मणच इथपर्यंत जाऊ शकतात -शुद्रांनी या पलीकडे जाऊ नये’, ‘शुद्रांनी या गल्लीत राहू नये’, ‘या गल्लीत पंचमानी चालू नयेत’, ब्राह्मणांच्या मालकीच्या प्रत्येक कॉफी शॉपमध्ये, प्रत्येक हॉलमध्ये, प्रत्येक मंदिरात, नियम लावले आहेत. लोकं विभागले गेले आहेत. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने उठून म्हणू द्या की, किमान या ठिकाणी कॉफी शॉप्स आणि ब्राह्मण हॉटेल्समधील ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ असे फलक काढून टाकले जातील, आणि हे त्यांनी मान्य करावे.

अधिक वाचा: पंतप्रधान मोदी यांना भेट दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा आणि अफजलखानाच्या वधाचा नेमका संबंध काय?

एकदा के. के. कन्नन आनंदपुरमला जात असताना अस्पृश्यतेच्या प्रथेचा अनुभव त्यांना आला. जेव्हा कन्नन यांनी मित्रांसह कॉफी हाऊसमध्ये प्रवेश केला तेव्हा नायर ब्राह्मण मालकाने त्यांना सांगितले की, कॉफी प्यायल्यानंतर ते ग्लास धुणार असतील तरच त्यांना कॉफी पिता येईल. कन्नन यांनी केवळ नकारच दिला नाही, तर ११ ऑगस्ट १९४५ रोजी या प्रथांवर बंदी घालणारा ठराव काँग्रेसच्या परिषदेत मांडला.

एकूणच कॉफीचा इतिहास तिच्या रंगाप्रमाणे गडद असला तरी आजच्या कॉफीच्या आवडीला कोणत्याही जातीचं बंधन नाही. भारतातील अनेकांच्या आवडीचे पेय म्हणून कॉफीने आपली जागा अबाधित ठेवली आहे.