-अनिकेत साठे

जगात वाळवंटे, पर्वतीय प्रदेश, जंगल आणि थंड प्रदेशात कार्यरत असणारे तसेच इराक, अफगाणिस्तान, चाड येथील लष्करी कारवायांमध्ये सहभाग नोंदविणारे सी २९५ या मालवाहू विमानांचे टाटा-एअरबसच्या सहकार्याने गुजरातमधील बडोदा येथे उत्पादन होणार आहे. खासगी उद्योगामार्फत लष्करी विमान निर्मितीचा देशातील हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. या निमित्ताने युरोपबाहेर प्रथमच त्याचे उत्पादन होत आहे. साधारणत: पुढील चार वर्षांत देशात तयार झालेले पहिले सी २९५ आकाशात झेपावेल. या विमानाच्या क्षमतेचा हा वेध.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
importance of rest for airline pilots
विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
GE Aerospace going to Invest Rs 240 Crore in Pune Plant Expansion
विमान इंजिनची निर्मिती करणाऱ्या जीई एरोस्पेसची पुण्यात मोठी गुंतवणूक

सी २९५ विमानाचा करार काय? 

भारतीय हवाई दलातील एवरो- ७४८ या जुन्या विमानांची जागा आधुनिक सी २९५ मालवाहू विमाने घेणार आहेत. जुनी विमाने बदलण्यासाठी भारताने ५६ सी २९५ विमाने खरेदी करण्यासाठी एअरबस डिफेन्स ॲण्ड स्पेस कंपनीशी २१ हजार ९३५ कोटींचा करार केला आहे. या विमानाची मूळ निर्मिती कॉस्ट्रिक्शुनेस एरोनॉटिक्स एसए या स्पॅनिश उत्पादकाने केली होती. ती कंपनी आता एअरबसचा भाग असून या विमानांचे उत्पादन स्पेनमधील प्रकल्पात केले जाते. भारतीय हवाई दलासाठी टाटा-एअरबसच्या सहकार्याने गुजरातमधील बडोदा येथील प्रकल्पात या विमानांचे उत्पादन होणार आहे.

उत्पादनाचे वेळापत्रक कसे आहे?

करारानुसार एअरबस चार वर्षात प्रथम स्वत:च्या (स्पेन) प्रकल्पात १६ विमाने तयार करणार. सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ती भारतीय हवाई दलास दिली जातील. उर्वरित ४० विमाने टाटा ॲडव्हान्स सिस्टिम लिमिटेड देशात तयार करणार आहे. देशातील पहिले विमान सप्टेंबर २०२६मध्ये तयार होईल. उर्वरित ३९ विमाने ऑगस्ट २०३१ पर्यंत देण्याचे नियोजन आहे. या विमानाचा उपयोग नागरी वाहतुकीसाठी केला जाऊ शकतो.

सी २९५ ची वैशिष्ट्ये काय?

सी २९५ एमडब्ल्यू हे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज पाच ते १० टन क्षमतेचे बहुउद्देशीय विमान आहे. अधिकतम ४८० किलोमीटर प्रतितास वेगाने मार्गक्रमण करू शकते. कुठल्याही हवामानात ११ तास उड्डाणाची त्याची क्षमता आहे. जलदपणे सामग्रीची चढ-उतार करता येईल, अशा खास पद्धतीचा मागील बाजूला दरवाजा आहे. जलद प्रतिसादासाठी तो महत्त्वपूर्ण ठरतो. सैन्य वा वस्तू हवाई छत्री (पॅराशूट) सोडण्यासाठी एक दरवाजा आहे. हे विमान अतिशय कमी जागेत उड्डाण व जमिनीवर उतरू शकते. त्याच्या आतील भागात या वर्गातील इतर विमानांच्या तुलनेत अधिक प्रशस्त जागा आहे. ज्यात ७१ जणांना बसता येईल. मागील दरवाजातून स्पर्धक विमानांपेक्षा अधिक सामग्री वाहून नेता येते. वैशिष्ट्यपूर्ण पंख्याच्या आकारामुळे इंधन वापरात चार टक्के बचत होते. पर्वतीय क्षेत्रातील उड्डाणात सुरक्षितता जपली जाते, असा दावा कंपनी करते.

वेगळेपण काय?

युद्धजन्य परिस्थितीत जलद हालचाल आणि पुरवठा व्यवस्था अतिशय महत्त्वाची असते. त्या दृष्टीने निर्मित सी २९५ हे विमान आघाडीवरील धावपट्ट्यांवर सैन्य व लष्करी सामग्रीची जलदपणे वाहतूक करण्यास सक्षम आहे. त्यास उड्डाण आणि जमिनीवर उतरण्यासाठी अतिशय कमी जागा लागते. अगदी २२०० फूट लांबीच्या धावपट्टीवरून ते संचलित करता येते. रणनीतीच्या दृष्टीने अनेकदा कमी उंचीवरून उड्डाण मोहीम आखली जाते. अशा मोहिमेत ते ११० नॉट्स इतक्या कमी वेगात मार्गक्रमण करू शकते. वाळवंटी प्रदेशापासून ते समुद्रापर्यंतच्या क्षेत्रात दिवसा व रात्रीच्या मोहिमा ते संचलित करू शकते.

वापर कुठे, उपयुक्तता कशी?

सशस्त्र दलांकडून विविध हवाई वाहतूक मोहिमांची मागणी वाढत आहे. कुठल्याही मोहिमेत ध्येय गाठण्यात सी २९५ सहाय्यभूत ठरू शकतात. या विमानाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन आजवर एअर बसकडे एकूण २८५ विमानांची मागणी नोंदविली गेली. त्यातील २०३ विमाने तयार करून संबंधित देशांना पुरविली गेली. सद्यःस्थितीत जगात २०१ सी २९५ विमाने वापरात आहे. ही विमाने ब्राझीलमधील जंगल, दक्षिण अमेरिकेतील कोलंबियन पर्वत, पश्चिम आशियात अल्जीरिया, जॉर्डनचे वाळवंट, युरोपमधील पोलंड, फिनलंडच्या थंड हवामानात कार्यरत आहे. चाड, इराक आणि अफगाणिस्तानमधील लष्करी कारवायांमध्ये त्यांचा वापर झाला. भारताला वैविध्यपूर्ण सीमा प्रदेश लाभले असून सैन्य दलांना ते उपयुक्त ठरणार आहे.

स्थानिक पातळीवर काय होणार?

खासगी उद्योगामार्फत लष्करी विमान उत्पादनाचा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. कालांतराने तो प्रवासी विमानांशी संलग्न होईल. सी २९५ विमानात इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रासाठी आवश्यक प्रणाली भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडकडून विकसित करण्यात येणार आहे. एअरबस स्पेनमध्ये उत्पादन प्रक्रियेत जे काम करते, त्यातील ९६ टक्के काम बडोदा येथील प्रकल्पात होईल. विमानातील स्वदेशी सामग्री ही भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक असणार आहे. १३ हजार ४००हून अधिक सुट्टे भाग, ४६०० जोडण्या आणि सात प्रमुख भागांच्या बांधणीचे काम येथे होईल. एअरबस डिफेन्स व स्पेस कंपनी इंजिन, उतरण्यासाठीची प्रणाली (लँडिंग गिअर), इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी सामग्री उपलब्ध करेल. टाटा समूहाने सुट्टे भाग, सामग्रीच्या पुरवठ्यासाठी सात राज्यांतील १२५ हून अधिक लघू-मध्यम उद्योगांची चाचपणी केलेली आहे. या माध्यमातून ६०० उच्च कुशल व तीन हजारहून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. २४० अभियंत्यांना स्पेनमधील एअरबस प्रकल्पात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.