स्वयंपाकघरात सढळ हाताने वापरल्या जाणाऱ्या जिऱ्याला यंदा पहिल्यांदाच उच्चांकी दर मिळाला. किरकोळ बाजारात एक किलो जिऱ्याचे दर ७०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. महिनाभरापूर्वी उच्चांकी दर मिळालेल्या जिऱ्याचा हंगाम मार्च महिन्यात सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिऱ्याला उच्चांकी भाव का मिळाला?

एरवी बाजारात जिऱ्याचे दर साधारणपणे २५० ते ३५० रुपये किलोपर्यंत असतात. दोन वर्षे राजस्थान आणि गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा लागवडीला फटका बसला होता. लागवड कमी झाल्याने उत्पादन कमी मिळाले होते. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्याने जिऱ्याला उच्चांकी दर मिळाले होते. देशात गुजरात आणि राजस्थानात जिऱ्याची लागवड केली जाते. जिऱ्याच्या जगातील उत्पन्नापैकी ७० टक्क्यांहून अधिक उत्पादन भारतात होते. सुमारे दहा लाख हेक्टरवर सात लाख २५ हजार टन जिऱ्याचे उत्पादन होते. गेल्या दोन वर्षांत मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्याने जिऱ्याच्या दरात पहिल्यांदाच उच्चांकी वाढ झाली.

हेही वाचा : युवा विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताच्या कोणत्या खेळाडूंकडून विशेष अपेक्षा?

देशातील सर्वात मोठा जिरे बाजार कोठे?

अहमदाबादपासून १०० किलोमीटर अंतरावर ऊंजा गावात देशातील सर्वात मोठी जिरे बाजारपेठ आहे. गुजरातमधील कच्छ, सौराष्ट्र, बनासकाठा, राजस्थानमधील अबूनगर, श्रीगंगानगर भागात जिऱ्याची लागवड केली जाते. तेथून जिरे गुजरातमधील ऊंजा बाजारात विक्रीस पाठविले जाते. ऊंजातून देशभरात जिरे विक्रीस पाठविले जाते. जिरे आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी मानले जातात. त्यामुळे जिऱ्याला वर्षभर मागणी असते. भारतातील जिऱ्याला पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या शेजारी राष्ट्रांकडून मोठी मागणी असते. जिरे, मोहरी भारतीय उपखंडात व्यंजनातील अविभाज्य पदार्थ मानले जातात.

परदेशातील जिरे अपुरे का?

परदेशात सिरिया, तुर्कीये, इराण, अफगाणिस्तानात जिऱ्याची लागवड केली जाते. पण उत्पादन अपुरे आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात भारतातून जिरे निर्यात केले जाते. भारतात दरवर्षी साधारणपणे जिऱ्याचे उत्पादन ७५ लाख पिशव्या होते. गेले दोन हंगाम भारतातील जिऱ्यांचे उत्पादन ५० ते ५५ लाख पिशव्या एवढे झाले होते.

हेही वाचा : पिस्तुल, बंदुक वापरण्याचा परवाना कुणाला मिळतो? कसा मिळतो?

शेतकऱ्याचा जिरे लागवडीकडे कल का?

गेले दोन हंगाम जिऱ्याला चांगले दर मिळाले होते. चांगले दर मिळाल्याने यंदा गुजरात आणि राजस्थानातील शेतकऱ्यांनी जिऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. देशातील अन्य राज्यात जिऱ्याची आवक फारशी केली जात नाही. यंदाच्या हंगामात जिरे लागवड वाढली आहे. मार्च महिन्यात जिऱ्याचा हंगाम सुरू होतो. हंगामातील पहिल्या टप्यातील आवक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. अनुकूल हवामानामुळे यंदा राजस्थान आणि गुजरातमध्ये जिऱ्यांची उच्चांकी लागवड झाली आहे. होळीनंतर राजस्थान, गुजरातमधील शेतकरी गुजरातमधील बाजारात जिरे विक्रीस पाठवितात. हवामानात बदल न झाल्यास यंदा जिऱ्याची उच्चांकी उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. साधारणपणे ९५ ते एक लाख पाच हजार पिशव्या एवढे जिरे उत्पादन मिळणार आहे. होळीनंतर जिऱ्याच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता असून, जिऱ्याचे दर २५० रुपये किलोपर्यंत कमी होतील.

हेही वाचा : विश्लेषण : इम्रान यांच्या ‘बाउन्सर’समोर पाकिस्तानी लष्कर, शरीफ-भुत्तो हैराण? निवडणुकीत अनपेक्षित मुसंडी कशी?

जागतिक बाजारपेठेत…

यंदा परदेशात जिऱ्याची लागवड चांगली

जगातील जिऱ्याचे उत्पादन सुमारे १० लाख टन एवढे आहे. त्यामध्ये भारताचा वाटा सर्वाधिक आहे. सिरिया,चीन, अफगाणिस्तानातही जिऱ्याची लागवड चांगली झाली आहे. परंतु परदेशातील जिऱ्याच्या तुलनेत भारतीय जिऱ्याची प्रतवारी उत्तम मानली जाते. त्यामुळे भारतातील जिऱ्याला जगभरातून मागणी असते.

rahul.khaladkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did the price of jeera cumin increased as 1 kg jeera for rupees 700 print exp css
First published on: 10-02-2024 at 08:21 IST