रशियात होणाऱ्या २१ व्या फिफा विश्वचषकात फ्रान्सचा संघ सगळ्यात प्रतिभावान असावा. असं विधान करण्यापाठीमागे दोन कारणं आहेत. एकतर या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे, आणि दुसरं म्हणजे या संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्यात स्वत:च्या खेळाच्या जोरावर सामन्याचं चित्रं पालटण्याची क्षमता आहे. आजच्या लेखामध्ये फ्रान्सच्या एकंदरीत  कामगिरीचा आढावा घेणार आहोत.

  •  यंदाच्या संघात १९९८ च्या संघाची झलक

फ्रान्सच्या यंदाच्या संघात १९९८ सालच्या दिदिएर देसचॅम्प्स यांच्या संघाची झलक पाहायला मिळते. १९९८ च्या विश्वविजेत्या फ्रान्सच्या संघात देशचॅम्प्स, झिनेदिन झिदान, एमान्युएल पेटिट, मार्सेल डेसेली, लिलियन थुराम, फॅबियन बार्थेज असे दमदार खेळाडू होते. इतकच नाही तर फ्रान्सची त्यावेळची राखीव खेळाडूंची फळी तितकीच मजबूत होती. फ्रान्सच्या यंदाच्या संघात पॉल पोग्बा, अॅन्टाएन ग्रिझमन, कायलियन एमबापे, एन्गोलो कान्ते, उस्मान डेम्बेले, ह्युगो लोरिस, सॅम्युएल उमतिती सारख्या एकापेक्षा एक अशा सरस खेळाडूंचा भरणा आहे. याच खेळाडूंच्या जोरावर फ्रान्स २० वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पाहू लागला आहे.

  • फ्रान्स – विश्वचषकातला डार्क हॉर्स

यंदाच्या फिफा विश्वचषकात फ्रान्सला डार्क हॉर्स असं म्हटलं जातं आहे. कारण अॅन्टाएन ग्रिझमन, कायलियन एमबापे, ऑलिव्हियर जिरुड, थॉमस लेमार या खेळाडूंवर फ्रान्सच्या आक्रमणाची धुरा असेल. स्पेनच्या अॅथलेटिको माद्रिदकडून खेळणाऱ्या ग्रिझमनने गेल्या मोसमात ४९ सामन्यांत २९ गोल डागले होते. तर १९ वर्षीय कायलिन एमबापे ही शानदार फॉर्मात आहे. फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मेनकडून खेळणारा एमबापे पहिल्यांदाच विषचषकात खेळताना दिसेल. एमबापेने गेल्या मोसमात ४४ सामन्यांमध्ये २१ गोल झळकावले आहेत. ग्रिझमन आणि एमबापेला पर्याय असतील ते ऑलिव्हियर जिरुड आणि थॉमस लेमार. जिरुड आणि लेमारनंही गेल्या मोसमात व्यावसायिक फुटबॉलमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमठवला आहे.

आघाडीच्या या फळीला साथ मिळणार आहे ती पॉल पोग्बा, एन्गोलो कान्ते आणि उस्मान डेम्बेले या खेळाडूंची. २०१४ सालचा विश्वचषक खेळण्याचा अनुभव पॉल पोग्बाच्या गाठीशी आहे. पोग्बामध्ये स्वत: गोल करण्याची आणि इतर खेळाडूंना गोल करण्यात मदत करण्याची क्षमता आहे. पोग्बानं गेल्या मोसमात मॅनचेस्टर युनायटेडसाठी समाधानकारक कामगिरी बजावली आहे. २०१८ च्या विश्वचषक पात्रता फेरीतही पोग्बानं नेदरलँड्स आणि स्वीडनविरुद्ध गोल झळकावले होते. सॅम्युएल उमतिती, बेन्जामिन मेन्डी, ब्लेस मतौडी, राफेल वरानेसारखे खेळाडू फ्रान्सची बचावफळी सांभाळताना दिसतील. फ्रान्सचा कर्णधार आणि गोलकीपर ह्युगो लोरिसच्या गाठीशी ९८ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याचा हाच अनुभव फ्रान्सला यंदाच्या विश्वचषकात किमान उपांत्य फेरी तरी गाठून देईल असं म्हटलं जात आहे. ह्युगो लोरिसनं २०१० आणि २०१४ अशा दोन विश्वचषकात फ्रान्सचं प्रतिनिधित्त्व केले आहे.

  • फ्रान्सची विश्वचषकातली कामगिरी

फ्रान्सचे सध्याचे प्रशिक्षक दिदिएर देसचॅम्प्स यांच्या नेतृत्त्वाखाली फ्रान्सने १९९८ साली फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होत. फिफाच्या जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या फ्रान्सने आतापर्यंत १४ वेळा विश्वचषकात भाग घेतला आहे. २००६ साली फ्रान्सला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. तर २०१४ साली ब्राझिलमध्ये झालेल्या विश्वचषकात फ्रान्सचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं होतं.

  • प्रशिक्षक देसचॅम्प्स यांचा तगडा अनुभव

एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून दिदिएर देसचॅम्प्स यांच्या गाठिशी तब्बल ३३ वर्षांचा अनुभव आहे. फुटबॉलच्या मैदानात त्यांनी अनेक चढउतारही पाहिले आहेत. कारण १९९० आणि १९९४ साली विश्वचषकासाठी अपात्र ठरलेल्या फ्रान्सच्या संघाला देशचॅम्प्स यांनी १९९८ साली विश्वचषक जिंकून देण्याचा पराक्रम गाजवला होता. दिदिएर देसचॅम्प्स यांनी मार्से, युवेंटस, चेल्सी, व्हॅलेंसिया सारख्या बड्या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. एक प्रशिक्षक म्हणूनही देशचॅम्प्स यांच्या गाठीशी १७ वर्षांचा अनुभव आहे. देसचॅम्प्स यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सने २०१६ साली युरो चषकाची अंतिम फेरी गाठली होती. आता मात्र देसचॅम्प्स यांचं लक्ष लागलं आहे ते विश्वचषकाकडे.

  • देसचॅम्प्स रचणार का नवा इतिहास?

 जर फ्रान्सनं यंदाचा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला तर मारियो झगालो आणि फ्रांज बेकनबॉयर यांच्यानंतर एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकणारे देसचॅम्प्स हे तिसरेच व्यक्ती ठरतील. मारियो झगालो यांनी १९५८ आणि १९६२ साली ब्राझिलकडून एक खेळाडू म्हणून विश्वचषक जिंकला होता. तर १९७० साली झगालो यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझिलनं विश्वचषकावर नाव कोरलं होतं. जर्मनीच्या फ्रांज बेकनबॉयर यांनी १९७४ साली खेळाडू म्हणून आणि १९९० साली जर्मनीचे प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. आता देसचॅम्प्स यांचा फ्रान्सचा संघ विश्वचषकात काही उलटफेर करुन नवा इतिहास रचणार का याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

  • विजय शिंदे

आपल्या प्रतिक्रिया vijay.majha@gmail.com वर कळवा