FIFA World Cup 2018 CRO vs ENG : फिफा विश्वचषक स्पर्धेत बुधवारी दुसरा उपांत्य सामना झाला. या सामन्यात क्रोएशियाने इंग्लंडला २-१ असे पराभूत केले. सामन्याच्या पूर्वार्धात इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात क्रोएशियाने पुनरागमन करत आक्रमण केले. सामन्याच्या ६८व्या मिनिटाला पेरिसीचने गोल केला आणि क्रोएशियाला बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर देण्यात आलेल्या अतिरिक्त कालावधीत १०९व्या मिनिटाला गोल करत क्रोएशियाने सामना जिंकला. क्रोएशियाने हा सामना जिंकून पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक दिली. या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणारा क्रोएशिया हा १३ वा संघ ठरणार आहे.

या सामन्यांनतर क्रोएशियाच्या चाहत्यांनी देशात आणि स्टेडियममध्येही जोरदार सेलिब्रेशन केले. क्रोएशियाच्या खेळाडूंनीही आपला आनंद व्यक्त केला. आणि सर्व चाहत्यांचे आभार मानण्यासाठी मैदानावर धावायला सुरुवात केली. या दरम्यान या खेळाडूंच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासाठी फोटोग्राफरही त्यांच्यामागे धावत होता. या गडबडीत खेळाडूंचा चुकून फोटोग्राफरला धक्का लागला आणि तो जमिनीवर पडला.

त्यानंतर आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात खेळाडूंनी त्या फोटोग्राफरला उभे राहण्यास मदत केली. आणि त्यात भर म्हणून हा खेळाडूंनी त्या फोटोग्राफरची माफी मागत त्याच्या कपाळावर चुंबन घेतले.

हा व्हिडीओ अनेकांनी ट्विट केलं असून काहींनी त्या फोटोग्राफरला ‘फोटोग्राफर ऑफ द डे’ असेही संबोधले. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.