FIFA World Cup 2018 : यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत अनेक नवे विक्रम खेळाडूंनी प्रस्थापित केले असून बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात क्रोएशिया विरुद्ध खेळताना इंग्लंडचा खेळाडू किरेन ट्रीपीयर याने एक किमया साधली. जी इंग्लंडचाच महान खेळाडू बेकहॅमशी बरोबरी करणारी ठरली. या सामन्यांत ट्रीपीयरने फ्री किकवर कोणाच्याही मदतीशिवाय बॉल थेट जाळीमध्ये धाडला.


ट्रीपीयरचा हा गोल थेट बेकहॅमच्या त्या फ्रि किकशी तुलना करणारा ठरला. जेव्हा १९९८मध्ये डेव्हिड बेकहॅमने अशाच प्रकारे फ्रि किकवर कोणाचीही मदत न घेता थेट गोल केला होता. त्यानंतर अशाच प्रकारे फ्रि किकवर थेट गोल करणारा ट्रीपीयर हा दुसरा इंग्लंडचा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर हा या विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यातलाही पहिलाच असा गोल ठरला.

बेकहॅमने १९९८ आणि २००६ मधील विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी एक गोल केला होता. त्याचीच पुनरावृत्ती ट्रीपीयरने केल्याने ट्वीटरवरुन अनेकांनी त्याची तुलना बेकहॅमशीच केली. ट्रीपीयर हा नवा बेकहॅम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बुधवारी उपांत्य फेरीतल्या दुसऱ्या समान्यांत क्रोएशियाने ऐतिहासिक कामगिरी करीत इंग्लंडला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ ने नमवून पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे आता यापूर्वीच अंतिम फेरीत दाखल झालेल्या फ्रान्सच्या संघाशी क्रोएशियाची लढत होणार आहे.