नवा सामना, नवा विक्रम हे समीकरण ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी लिहीलं गेलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फिफा विश्वचषकातही ख्रिस्तियानो रोनाल्डोची जादू कायम आहे. रशियाच्या सोचीमध्ये स्पेनविरुद्ध सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोनं हॅटट्रिक झळकावून अनेक विक्रम आपल्या नावावर केले. स्पेनविरुद्ध रोनाल्डोनं पेनल्टी शूटवर पहिला गोल डागला आणि सलग आठ मोठ्या स्पर्धांमध्ये गोल करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. तसेच सलग चार विश्वचषकात गोल करणारा रोनाल्डो हा आजवरचा चौथाच खेळाडू ठरला. रोनाल्डोनं २००६, २०१० आणि २०१४ च्या फिफा विश्वचषकात गोल झळकावले होते. ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले, जर्मनीचे सीलर आणि मिरोस्लाव्ह क्लोझा यांनीही चार विश्वचषकात गोल झळकावण्याचा विक्रम केला होता.

रोनाल्डोनं स्पेनविरुद्धच्या सामन्यात ८८ व्या मिनिटाला गोल डागून आपली हॅटट्रिक साजरी केली. रोनाल्डोची ही कारकिर्दीतली ५१ वी हटट्रिक ठरली. विशेष म्हणजे फिफा विश्वचषकातल्या आजवरच्या इतिहासातलीही ही ५१ वी हॅटट्रिक होती. दररोज नवे विक्रम रचणे ही जणू रोनाल्डोची सवयच झाली आहे. मग व्यावसायिक फुटबॉल असो वा आंतरराष्ट्रीय फुटबॉल, रोनाल्डोकडून होणारा प्रत्येक गोल हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जातोय.

अनेक चाहते रोनाल्डो आणि मेसीच्या तुलनेत मेसीला वरचं स्थान देतात. काहींना रोनाल्डो फारसा आवडतंही नाही. पण मोक्याच्या वेळी गोल करुन आपल्या संघाला विजय मिळवून देणारा खेळाडूच माझ्या दृष्टीने सगळ्यात श्रेष्ठ ठरतो. या निकषावर माझ्यामते रोनाल्डो हा मेसीपेक्षा श्रेष्ठ ठरतो. ज्यावेळी मी रोनाल्डो हा मेसीपेक्षा सरस फुटबॉलपटू आहे असं म्हणतो, याचा अर्थ मेसी चांगला खेळाडू नाही असा अजिबात होत नाही. मेसीनं आजवर व्यावसाय़िक फुटबॉलमध्ये सर्वकाही मिळवलं आहे. एक परिपूर्ण खेळाडू म्हणून मेसीची ओळख आहे. असं म्हणतात की अर्जेन्टिना ही वन मॅन टीम आहे, म्हणजेच मेसीच्या एकट्याच्या खांद्यावर अर्जेन्टिनाची मदार असते. काही प्रमाणात रोनाल्डोच्या बाबतीतही हाच निकष लागू होतो. म्हणजे पोर्तुगालच्या संघातील रोनाल्डोसोडून इतर खेळाडूंची नावं कोणाला विचारली तर अनेकांना ती पटकन सांगता येणार नाहीत.

रोनाल्डोने आतापर्यंत मॅनचेस्टर युनायटेड, रियाल माद्रिद या संघांकडून अनेक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. मेसी इतकाच म्हणजेच पाच वेळा बॅलेन डी ओर पुरस्कारही रोनाल्डोनं आपल्या नावावर केला आहे. याचसोबत २०१६ साली रोनाल्डोने पोर्तुगालला युरो कपचं विजेतेपद मिळवून दिलं आहे. दुर्दैवाने लायनेल मेसीला ही कामगिरी आपल्या देशासाठी अद्याप करता आलेली नाहीये. मात्र आता रशियातला विश्वचषक हा रोनाल्डो आणि मेसी या दोन्ही खेळाडूंचा हा अखेरचा विश्वचषक असू शकतो. त्यामुळे या दोघांपैकी कोण आपल्या देशाला विश्वचषक जिंकून देतो याकडे साऱ्या क्रीडारसिकांचं लक्ष लागलं आहे.

  • विजय शिंदे

आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail या इमेल आयडीवर कळवा