FIFA World Cup 2018 CRO vs ENG : फिफा विश्वचषक स्पर्धेत बुधवारी रात्री स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात क्रोएशियाने इंग्लंडला २-१ असे पराभूत केले. सामन्याच्या पूर्वार्धात इंग्लंड आघाडीवर होते. पण हे चित्र उत्तरार्धात पालटले. पूर्वार्धात १-० ने पुढे असलेल्या इंग्लंडची नंतर पीछेहाट झाली आणि त्यांना सामना गमवावा लागला. आता क्रोएशिया १५ जुलै रोजी जगज्जेतेपदासाठी फ्रान्ससोबत झुंज देणार आहे.

क्रोएशियाचा हा विजय अनेक अंगांनी उल्लेखनीय ठरला. मात्र यातील सर्वात महत्वाचे म्हणजे इतिहासात प्रथमच क्रोएशियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे २०१८चा हा विश्वचषक जर क्रोएशियाने जिंकला, तर ‘फिफा’ला नवा चॅम्पियन मिळणार आहे. आणि तसे घडण्याची शक्यताही मानली जात आहे. कारण फिफाचा इतिहास पाहता शेवटी ८ असलेल्या साली झालेल्या विश्वचषकात प्रत्येक वेळी फिफाला नवीन चॅम्पियन मिळाला आहे.

काय आहे हा योगायोग…

फिफा विश्वचषक स्पर्धेची सुरुवात १९३० साली झाली. त्यानंतर सामान्यतः दर ४ वर्षांनी ही स्पर्धा खेळली गेली. त्यातील योगायोग म्हणजे १९५८, १९७८ आणि १९९८ या साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत फिफाला नवा चॅम्पियन मिळाला होता. १९५८ साली झालेल्या स्पर्धेत पहिल्यांदा ब्राझीलला विजेतेपद मिळाले होते. या नंतर ब्राझीलने ४ वेळा विश्वचषक जिंकला. १९७८ साली ब्राझीलचा हा इतिहास अर्जेंटिनाने कायम राखला. त्यांनी त्या वर्षी पहिलेवहिले विजेतेपद पटकावले. याशिवाय, १९९८ सालीही इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि फ्रान्सने आपला पहिला विश्वचषक जिंकला. १९३८ सालीही फ्रान्सला विश्वचषक विजेतेपद मिळाले होते. मात्र त्यावेळी ही स्पर्धा गटनिहाय पद्धतीने खेळवली जात नव्हती.

आता यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया असा अंतिम सामना रंगणार आहे. क्रोएशिया हा संघ अंतिम फेरीत प्रथमच पोहोचला आहे. त्यामुळे यंदाही या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा नेटकऱ्यांना आहे.

हा सामना रविवारी १५ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता सुरु होणार आहे.