अमेरिकेची झुमवाल्ट ही गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर भविष्यवेधी युद्धनौकांचा नमुना आहे. अमेरिकेने सुरुवातीला अशा प्रकारच्या ३२ युद्धनौका बांधण्याचा विचार केला होता. पण आता अशा केवळ तीनच युद्धनौका बांधल्या जात आहेत. त्यांपैकी एका नौकेची किंमत ४ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. तिची किंमत सध्या अवाजवी वाटत असली तरी त्यात अनेक नव्या तंत्रांचा समावेश केला आहे.

या युद्धनौकेचे झुमवाल्ट हे नाव अमेरिकेचे माजी अ‍ॅडमिरल एल्मो झुमवाल्ट यांच्या नावावरून घेतले आहे. प्रथमदर्शनीच तिचे वेगळेपण नजरेत भरते ते तिच्या रचनेमुळे. तिच्या रचनेत ‘टम्बलहोम हल’चा वापर केला आहे. म्हणजे नौकेचा मुख्य भाग तळाकडे पसरट आणि पाण्यावरच्या भागात निमुळता आहे. ही रचना नेहमीच्या रचनेच्या उलटी आहे. ती १९०५ च्या जपान-रशिया युद्धापर्यंत वापरात होती. आता झुमवाल्टमध्ये ती पुन्हा वापरण्यात आली आहे. त्याने नौकेचा पाण्याशी होणारा प्रतिरोध किंवा घर्षण कमी होऊन वेग वाढतो आणि इंधनाची बचत होते.

शत्रूच्या नजरेपासून लपून राहणे हा यापुढील सर्वच शस्त्रास्त्र प्रणालींच्या दृष्टीने महत्त्वाचा गुण राहणार आहे. त्या दृष्टीने झुमवाल्टमध्ये स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तिची रचना बंदिस्त आणि तिरप्या कोनात केली आहे. जहाजांवरील नेहमीचा पसारा झुमवाल्टवर दिसत नाही. त्याने झुमवाल्ट शत्रूच्या रडारपासून बऱ्याच प्रमाणात लपून राहू शकते. अन्य युद्धनौकांच्या तुलनेत झुमवाल्टची ‘रडार सिग्नेचर’ १/१५ (१ छेद १५) इतक्या प्रमाणात कमी आहे. आधुनिक रडार, सोनार, संवेदक (सेन्सर), संगणकीकृत यंत्रणा यामुळे झुमावाल्टवर अन्य युद्धनौकांच्या तुलनेत निम्मे म्हणजे साधारण १५० कर्मचारी आहेत.

तिच्यावरील शस्त्रसंभारही प्रगत आणि प्रभावी आहे. मुख्य डेकवर दोन १५५ मिमी व्यासाच्या तोफा आहेत. त्या बंदिस्त आवरणात असल्याने सहज दिसत नाहीत. त्यातून ८३ सागरी मैल किंवा १५४ किमी अंतरावर ‘रॉकेट असिस्टेड’ तोफगोळे डागता येतात. तोफेला ‘मल्टिपल राऊंड्स सायमल्टेनिअस इम्पॅक्ट’ प्रणाली आहे. म्हणजे एका वेळी अनेक तोफगोळे डागून ते एकाच लक्ष्यावर एका वेळी पाडता येतात. झुमवाल्टवरील २० ‘व्हर्टिकल लाँचिंग सिस्टिम’मधून सी-स्पॅरो आणि टॉमहॉक या प्रकारची ८० क्षेपणास्त्रे डागता येतात. याशिवाय सी-हॉक हेलिकॉप्टर, स्काऊट आणि अन्य ड्रोन झुमवाल्टची क्षमता आणि पल्ला वाढवतात.

सध्या झुमवाल्टची अवास्तव किंमत हा अमेरिकेत चर्चेचा मुद्दा असला तरी या युद्धनौकेतून भविष्यातील अनेक शस्त्रास्त्र प्रणालींचा विकास होत आहे.

sachin.diwan@ expressindia.com