नाझी जर्मनीने १ सप्टेंबर १९३९ रोजी पोलंडवर आक्रमण केले आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. जर्मन आक्रमणाची भिस्त पँझर रणगाडय़ांवर होती. वास्तविक पँझर-१ आणि २ च्या तुलनेत पोलंडकडील  ‘७-टीपी’ हे रणगाडे उजवे होते. ‘व्हिकर्स मार्क-ई’ रणगाडय़ाची ती पोलिश आवृत्ती होती. त्यावर ३७ मिमीची बोफोर्स तोफ आणि दोन मशिनगन होत्या. पण पँझर-३ आणि ४ च्या माऱ्यापुढे ते हतबल होते. पोलिश रणगाडय़ांची संख्याही मर्यादित होती. अखेर तीन आठवडय़ांत जर्मन आक्रमणापुढे पोलंडने नांग्या टाकल्या.

त्यानंतर जर्मनीने पारंपरिक प्रतिस्पर्धी फ्रान्सकडे मोर्चा वळवला. जर्मनीचे संभाव्य आक्रमण थोपवण्याच्या उद्देशाने फ्रान्सने सीमेवर मॅजिनो नावाने मोठी तटबंदी उभारली होती. त्याच्यासमोर जर्मनीने सीगफ्रिड नावाने तटबंदी उभी केली होती. पण प्रत्यक्ष युद्धात जर्मनीने फ्रान्सच्या मॅजिनो तटबंदीला हातही लावला नाही. तिला वळसा घालून सरळ उत्तरेकडील बेल्जियममधून पँझर तुकडय़ा आत घुसल्या. आर्देनच्या जंगलातून प्रवेश करत जर्मनीने शत्रूला चकवले. म्यूज नदीचे खोरे, सेदान, फ्लॅव्हिऑन येथे झालेल्या संघर्षांत  फ्रान्सच्या ‘एफसीएम-३६’ या रणगाडय़ांनी जर्मन लाट थोपवण्याचा प्रयत्न केला. ‘एफसीएम-३६’ चे चिलखत ४० मिमी जाडीचे होते आणि त्यावर ३७ मिमीची मुख्य तोफ आणि एक मशिनगन होती. पण त्यांची पँझर-३ आणि पँझर-४ रणगाडय़ांपुढे धडगत नव्हती. त्यापेक्षा फ्रान्सचा ‘चार बी-१’ हा रणगाडा थोडा बरा होता. त्याचे चिलखत ६० मिमी जाड होते आणि त्यावर ७५ मिमीची मुख्य तोफ आणि दोन मशिनगन होत्या. पण त्यांचा वेग आणि एकूण पल्ला कमी होता. पँझरच्या रेटय़ापुढे त्यांचीही मात्रा चालेना.

Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?

तोपर्यंत ब्रिटनने फ्रान्सला मदत पाठवली होती. जर्मन फौजा वेगाने पश्चिमेकडे ब्रिटिश खाडीच्या दिशेने आगेकूच करत होत्या. त्यांना थोपवण्यासाठी आरा येथे मोठी लढाई झाली. त्यात ब्रिटनच्या ‘ए-११ माटिल्डा-१’ आणि ‘ए-१२ माटिल्डा-२’ या प्रकारच्या रणगाडय़ांनी प्रयत्नांची शिकस्त केली. माटिल्डा-१ रणगाडे १९३८ साली ब्रिटिश लष्करात दाखल झाले होते. ११ टन वजनाचा हा रणगाडा ताशी १३ किमी वेगाने एका दमात १२९ किमी अंतर पार करू शकत असे. त्यावर ६० मिमीचे चिलखत आणि दोन मशिनगन होत्या. हा रणगाडा पायदळाला पूूरक म्हणून विकसित केला होता. त्यामुळे त्याचा वेगही मर्यादित होता.

त्याला माटिल्डा नाव कसे पडले याच्याही रंजक कथा आहेत. त्या काळात एका कार्टून मालिकेतील माटिल्डा नावाचे बदकाचे पात्र खूप गाजले होते. हा रणगाडाही तसाच हलत-डुलत निवांत चालायचा. त्यामुळे जनरल सर ह्य़ू एलिस यांनी त्याला माटिल्डा नाव ठेवले. पण रणगाडय़ाचे डिझायनर जॉन कार्डन यांनी त्यांच्या मूळ रेखाटनात त्यांच्या हस्ताक्षरात ए-११ रणगाडय़ाला माटिल्डा असे सांकेतिक नाव दिल्याचे आढळते.

त्याची माटिल्डा-२ ही सुधारित आवृत्ती १९३९ साली वापरात आली. त्याचे चिलखत ७८ मिमी जाडीचे होते. त्यावर २ पौंडी तोफ आणि एक मशिनगन होती. त्याचा प्रवासाचा एकूण पल्लाही २५८ किमी होता. या रणगाडय़ांनी आराच्या लढाईत जर्मन पँझर रणगाडय़ांच्या नाकी नऊ आणले. अखेर जर्मन जनरल अर्विन रोमलच्या ७ व्या पँझर डिव्हिजनला माटिल्डांना रोखण्यासाठी फ्लॅक ८८ मिमी रणगाडाविरोधी तोफेची मदत घ्यावी लागली. जर्मनीचा विजय झाला, पण त्याची मोठी किंमत मोजावी लागली.

sachin.diwan@expressindia.com