दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला नाझी जर्मनीने रणगाडे, तोफा, लढाऊ विमाने आदींचा एकत्रित आणि वेगवान वापर करत अल्पावधीत पोलंड, बेल्जियम, नेदरलँड्स आणि फ्रान्सचा ताबा घेतला. हे नवे युद्धतंत्र ‘ब्लिट्झ-क्रिग’ (विद्युतवेगाचे युद्ध) म्हणून गाजले. जमिनीवरील लढाईत त्याची मुख्य भिस्त होती ती पँझर रणगाडय़ांवर आणि हाइन्झ गुडेरियन आणि अर्विन रोमेल यांसारख्या सेनानींवर.

पहिल्या महायुद्धात झालेल्या पराभवानंतर १९१९ सालच्या व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला रणगाडे तयार करण्यास बंदी होती; पण जर्मनीने गुप्तपणे रणगाडे बनवले आणि रशियातील कझान येथे रणगाडादलांना प्रशिक्षण दिले. जर्मनीत १९३३ साली अ‍ॅडॉल्फ हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने सर्व र्निबध झुगारून दिले. जर्मनीच्या रणगाडय़ांमध्ये प्रामुख्याने पँझर मालिकेतील १, २, ३, ४ आवृत्ती आणि पँझर-५ पँथर आणि पँझर-६ टायगर या रणगाडय़ांचा समावेश होता. हे रणगाडे शत्रूच्या सर्वच रणगाडय़ांपेक्षा सरस होते असे नाही, पण त्यांच्या यशाचे गमक एकत्रित वापरात होते. त्याउलट ब्रिटन आणि फ्रान्सने त्यांचे रणगाडे खूप विखरून ठेवले होते.

Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…

त्यातील पँझर-१ आणि पँझर-२ हे रणगाडे प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी तयार केले होते, पण तेही युद्धात वापरले गेले. गुडेरियन यांना तीन प्रकारचे रणगाडे हवे होते – शत्रूची आघाडीची मोर्चेबंदी भेदणारे अवजड रणगाडे, पायदळाला साथ देणारे इन्फंट्री टँक्स आणि शत्रूच्या फळीमागे वेगाने जाऊन घेराव घालणारे क्रुझर टँक्स; पण नंतर त्यांनी दोनच प्रकारांवर समाधान मानले. त्यातील पँझर-३ हा जनरल पर्पज क्रुझर टँक बनला, तर पँझर-४ इन्फंट्री सपोर्ट टँक बनला.

पँझर-१ हा १९३४ साली बनवलेला ५.४ टन वजनाचा रणगाडा ताशी ३९ किमी वेगाने प्रवास करू शकत असे. त्याचे चिलखत १५ मिमी जाडीचे होते आणि त्यावर केवळ दोन मशिनगन बसवल्या होत्या. हे रणगाडे स्पेनमधील अंतर्गत यादवीत (१९३६ ते १९३९), तसेच पोलंड आणि फ्रान्सच्या हल्ल्यातही वापरले. नंतर रशियाच्या रणगाडय़ांपुढे ते कुचकामी ठरू लागले.

पँझर-२ या १९३७ साली बनवलेल्या रणगाडय़ाचे चिलखत ३० मिमी होते. त्यावर २० मिमीची तोफ आणि एक मशिनगन असे. ते ताशी ४० किमीच्या वेगाने प्रवास करत.

पँझर-३ हे २० टनी रणगाडे ताशी ४० किमी वेगाने प्रवास करू शकत. त्यांच्यावर ३७ मिमीची रणगाडाभेदी तोफ आणि दोन मशिनगन होत्या. पोलंड आणि फ्रान्सविरुद्ध त्यांनी उत्तम कामगिरी केली; पण रशियन रणगाडय़ांचा सामना करण्यासाठी त्यांच्या सुधारित आवृत्तीवर ३० ते ५० मिमी जाडीचे चिलखत आणि ५० मिमीची तोफ बसवण्यात आली. हे रणगाडे रशियाच्या बहुतांश रणगाडय़ांवर मात करण्यास पुरेसे होते; पण रशियाच्या टी-३४ रणगाडय़ांच्या चिलखत आणि ७६.२ मिमीच्या तोफांपुढे ते हतबल ठरले.

पँझर-४ रणगाडय़ावर ७५ मिमीची तोफ आणि दोन मशिनगन होत्या आणि त्याचे चिलखत ३० ते ८० मिमी जाडीचे होते. हे २५ टनी रणगाडे ताशी ४० किमी वेगाने प्रवास करत. जर्मनीने १९३९ ते १९४५ या युद्धकाळात असे ८००० रणगाडे तयार केले. पँझर-४ हे जर्मनीच्या ताफ्यातील सर्वाधिक संख्येचे रणगाडे होते. ते रशियन टी-३४ रणगाडय़ांच्या साधारण तोडीचे आणि अमेरिकी शेरमन रणगाडय़ांपेक्षा काहीसे सरस होते.

दुसरे महायुद्ध आणि जर्मनीचे पँझर रणगाडे हे समीकरण दृढ झाले आहे.

sachin.diwan@expressindia.com