19 September 2020

News Flash

पर्यावरणपूरक सजावटीतून हिरवाईचा उत्सव!

मखर सजावटीसाठी कापड, माती, कागदाचे लगदे, लाकडी काठय़ा, फांद्या यांचा वापर करण्यात आला आहे.

डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हरित डोंबिवलीचा संदेश देणारी सजावट केली आहे

कल्याण, डोंबिवली शहर परिसरात गणेशोत्सव मंडळांकडून सामाजिक, वृक्ष, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक  संदेश देणाऱ्या मखर सजावटी (आरास) यावेळी करण्यात आल्या आहेत. बहुतेक गणेशोत्सव मंडळांनी थर्माकोलचा वापर कमी करून विघटन होणाऱ्या साधनांचा वापर मखर सजावटीसाठी केला आहे. वाढते तापमान, पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी समाजाचा एक घटक म्हणून आपणच महत्त्वपूर्ण भूमिका वठविणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरणस्नेही मखर सजावटीला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे, असे गणेशोत्सव मंडळांच्या बहुतेक कार्यकर्त्यांनी सांगितले.

मखर सजावटीसाठी कापड, माती, कागदाचे लगदे, लाकडी काठय़ा, फांद्या यांचा वापर करण्यात आला आहे. वाढते तापमान, पाऊस, पर्यावरण यांचा समतोल राखण्याची जबाबदारी आता प्रत्येक व्यक्तीवर येऊन पडली आहे, असा उपदेश करणारे संदेश मखर सजावटीच्या माध्यमातून सजावटकारांनी दिले आहेत. काही ठिकाणी पाणी बचत किती महत्त्वाची बाब आहे.

येणाऱ्या काळात पाण्याचा जपून वापर केला नाही तर किती भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचे दर्शन आराशीतून घडविण्यात आले आहे. घराच्या आवारातील विहिरी, कूपनलिकांमध्ये पावसाचे पाणी पुनर्भरण करून भूजल पातळी वाढविणे किती महत्त्वाचे आहे, याचे संदेश देण्यात आले आहेत.

डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हरित डोंबिवलीचा संदेश देणारी सजावट केली आहे. ही सजावट करताना रोमन शैलीतील स्थापत्यकलेचा वापर करण्यात आला आहे. २२५ विविध प्रकारची झाडे, फुले, वेलींचा वापर या सजावटीत करण्यात आला आहे. मखरासमोरील सभागृहात हिरवा गालिचा टाकल्यामुळे आपण हिरव्या गर्द झाडीत, वातावरणात आहोत असे काही क्षण वाटते.

कागद पुठ्ठय़ांची शिकवणी

निसर्गरम्य देखाव्यात पक्ष्यांचे आवाज, किलबिलाटाचे यांत्रिक ध्वनी सोडण्यात आले आहेत. त्यामुळे काही क्षण भाविक गणेश दर्शन घेताना मंत्रमुग्ध होतो. आपलं शहर आपण हिरवेगार करू शकतो, ठेवू शकतो, असा संदेश या मखर सजावटीच्या माध्यमातून टिळकनगर गणेशोत्सव मंडळाने दिला आहे. काही गणेशोत्सव मंडळांनी टाकाऊ कागद, पुठ्ठय़ांचा वापर करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीचे देखावे उभे केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 4:34 am

Web Title: eco friendly makhar decoration in kalyan by ganesh mandals
Next Stories
1 दागिन्यांनी अलंकृत ‘तयार’ गौरींना पसंती
2 पर्यावरणस्नेही विसर्जन!
3 उत्सवी धिंगाण्यात गाण्यांचा बाज बदलला
Just Now!
X