कर्जत तालुक्यातील (नगर) सिद्धटेक हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र आहे. देशात सर्वत्र गणरायाचे आगमन होताना सिद्धटेक येथे गणेशचतुर्थीला गणेशजन्म साजरा करण्यात येतो. या प्रथेप्रमाणे आज दुपारी दोन वाजता गणेशजन्माचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथेप्रमाणे सायंकाळी गणपतीची पालखी मंदिराच्या बाहेर काढण्यात आली. यंदा जहागीरदार देव यांचा पालखीचा मान होता. मंदिराच्या विश्वस्तांचे अधिकारी, ग्रामस्थ या वेळी मोठय़ा संख्येने हजर होते. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पालखीची मिरवणूक सुरू होताच जोरदार पाऊस आला, त्यामुळे भक्तांच्या उत्साहात भरच पडली.
संध्याकाळी पालखी पुन्हा मंदिरात आल्यानंतर गणेशमूर्तीला नवी वस्त्रे घालण्यात आली. मंदिरात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. येथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भक्तांच्या दर्शनासाठी रांगेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शन घेणे सहज शक्य होईल, असे मंदिराचे विश्वस्तांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2013 12:15 pm