कुंचल्याचे अवघे दोनचार फटकारे आणि त्यातून साकारले जाते तुमच्या नावाचा उल्लेख असलेले श्रीगणेशाचे शब्दरूपी चित्र. हे कौशल्य साध्य केले चंद्रकांत केशव बडीगेर या सामान्य श्रमिकाने. मुंबईत वेटरचे काम करणाऱ्या बडीगेरने वस्त्रनगरी इचलकरंजी गेल्या महिनाभरात सुमारे ४ हजारांहून लोकांचा नामोल्लेखासह समावेश करीत गणपतीचे सहज-सुंदर रेखाटन केले आहे. या कलाकाराच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी गणेशोत्सवात भरविल्या जाणाऱ्या इचलकरंजी फेस्टिव्हलमध्ये स्वतंत्र मंच उभारण्याचे नियोजन संयोजकांनी केले आहे.     
चंद्रकांत बडीगेर हा निस्सीम गणेशभक्त आहे. त्याला कोणाचेही आणि कितीही अवघड असलेले नाव सांगा, तो त्या शब्दांना सामावून घेऊन गणपतीचे चित्र काढतो. तेही सहजसोप्या पद्धतीने. कुंचल्याच्या अवघ्या दोनचार फटकाऱ्यानिशी. त्याची ही कला इचलकरंजीत चांगलीच लोकप्रिय होत चालली आहे. महिनाभरापूर्वी वस्त्रनगरी पाय ठेवलेल्या या कलाकाराने शाळा, महाविद्यालयांत जाऊन आपल्या या कलेचे प्रदर्शन घडविण्यास सुरुवात केली आहे. गोविंदराव हायस्कूल, गंगामय्या कन्या महाविद्यालय, डीकेटीई, शरद इन्स्टिटय़ूट अशा काही शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक यांच्यापर्यंत त्याची कला पोहोचली आहे. या कामी क्रीडा शिक्षक प्रा.चंद्रशेखर शहा यांची त्याला मोलाची साथ मिळाली आहे. कसलाही पुरावा नसल्याने त्याची राहण्याची अडचण होत होती, पण ती नंतर शहा यांनी दूर करीत एका लॉजमध्ये निवासाची सोय केली आहे.    
कागदामध्ये रंग भरून उत्तम चित्र साकारणाऱ्या चंद्रकांत बडीगेर या कलाकाराचे जगण्याचे चित्र मात्र बेरंग झालेले आहे. घाटकोपर (मुंबई) येथे जन्मलेल्या, वाढलेल्या बडीगेरचे १२ वी कॉमर्स पर्यंतचे शिक्षण झाले आहे. देव-देवतांची चित्रे, रांगोळी, थर्माकोलच्या कलाकृती याची त्याला मनापासून आवड होती. पण उदरनिर्वाहासाठी कलेकडे दुर्लक्ष करून त्याला हॉटेलमध्ये वेटरची नोकरी पत्करावी लागली. अलीकडेच मिरज येथे एका हॉटेल चालकाकडून घेतलेली मोठी रक्कम भागविण्याच्या विवंचनेत तो अस्वस्थ झाला होता. अशा स्थितीत एका खोलीत बंदिस्त करून घेतलेल्या बडीगेरला गणेशाची प्रतिमा, कलाकुसरीचे साहित्य व आयपॉड याचाच आधार होता. आता या विवंचनेतून मुक्त झालेल्या बडीगेरने आपल्या आवडीच्या गणेश रेखाटनावर लक्ष केंद्रित केले आहे.
विवेक या नावाने रेखाटलेले गणेशाचे चित्र त्याला मनापासून आवडते. चक्रधर, मार्मिक, शर्मिष्ठा, ज्योत्स्ना अशी अवघड नावातूनही त्याने गणेश चित्ररूपात साकारला आहे. इतकेच नव्हेतर अल्लाउद्दीन, ख्रिस्तोफर अशा अहिंदू नावे सांगून गणेश चित्र कसे काढले जाते याची परीक्षा घेणाऱ्यानाही चंद्रकांतने सुंदर चित्र काढून चकित केले आहे. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या कल्लाप्पा या नावाचा समावेश करूनही त्याने उत्तम चित्राची निर्मिती केली होती. अशा या कलाकाराची कला सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी इचलकरंजी फेस्टिव्हलने आगामी गणेशोत्सवामध्ये त्याच्यासाठी स्वतंत्र मंचच उभारण्याची तयारी केली आहे.