गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असल्याने तो अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाने एकत्र यावे यासाठी या उत्सवाला सार्वजनिक रुप दिले. गणपतीला आपण बुद्धीची देवता म्हणतो, त्याचबरोबर कलेची देवता म्हणूनही गणरायाची ओळख आहे. ६४ कला आणि १६ विद्या अवगत असलेल्या या बाप्पाचे स्वागत आनंदात होते. त्याला आपल्या घरात रमवण्यासाठी त्याची कलेच्या माध्यमातून सेवा करण्याचा प्रघात आहे.

समाजातील घडामोडींचे, वातावरणाचे पडसादही या कलेवर उमटल्याचे दिसते. महाराष्ट्रासारख्या एकाच राज्यात विविध शहरांमध्ये हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पुणे, मुंबई याठिकाणी हा उत्सव साजरा करण्याची पद्धत, परंपरा वेगवेगळी आहे. पूर्वी कोकणात गणेशोत्सवात जाखडी/बाल्या नाच हे लोकनृत्य सादर केले जायचे. आठ कलाकार वादकांच्या भोवती फेर धरायचे. ढोलकी आणि घुंगरू या पारंपरिक वाद्यांचा मेळ यात दिसायचा. उत्सवात पालखी नाचवण्याचा प्रकारही प्रामुख्याने कोकणातच पाहायला मिळतो. पालख्या नाचवण्यात रत्नागिरीची खास ओळख आजही आहे. जाखडी हा सामूहिक नृत्याचा प्रकार आहे. या नाचाला पूर्वी बाल्या नाच म्हणत. वेशभूषा, प्रकाशयोजना आणि वाद्यवृंद यांनी सध्याची जाखडी वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे. जाखडीचा सामना ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते.
शहरी भागात कलांचे प्रमाण कमी होत असले तरीही भजन, कीर्तन, सादरीकरण यांसारखे काही कार्यक्रम आयोजित कऱण्यात येतात. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ज्याठिकाणी झाली त्या पुण्यानेही समाजप्रबोधनाचा वसा जपला आहे. तर मुंबईच्या गणेशोत्सवाला काळानुरूप झगमगाटी स्वरूप आले आहे. त्या तुलनेत विदर्भ, मराठवाड्यात पारंपरिक पद्धतीने लोककला, नाटके, बतावण्या यासारखे कार्यक्रम आजही होतात. याविषयी पंडित वसंतराव गाडगीळ म्हणाले, यंदा गणेशोत्सव १२ दिवसांचा आहे. ज्यांच्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते, त्यांनी कलेचे दैवत असणाऱ्या गणेशासमोर कलेची उपासना करावी. यामध्ये वाद्य, संगीत, लोककला यांच्या सादरीकरणातून कलेचा जागर केलेला चांगला.

अनेक गणेशमंडळांतर्फेही मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याशिवाय सोसायटींमध्ये बसणाऱ्या गणपतीउत्सवातही लहान मुलांसाठी तसेच महिलांसाठी विविध कलास्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यास मदत होते. या सादरीकरणातून स्टेज डेअरिंग तर वाढतेच पण आपल्यातील सुप्त गुण बहरण्यास मदत होते. आज रंगभूमी आणि चित्रपटात काम करणारे अनेक कलाकार हे अशाच सादरीकरणातून पुढे आल्याचे आपल्याला दिसते.

याविषयी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, गणपती वैदिक परंपरेशी जोडला गेला आहे. नाटकामध्ये नांदी, लोककलांमध्ये गण याच्या माध्यमातून गणेशाला आवाहन केले जाते. गणपतीच्या रुपामुळे कलेमध्ये अनोखा रंग भरला जातो. गणेशाला तू कलेची, कलावंतांची प्रतिभा आणि प्रेरणा मानले जाते. त्यामुळे उत्सवादरम्यान अविष्कार घडायला हवेत. गायन, नृत्य, नाट्य, संगीत हे सादरीकरणाचे उत्तम माध्यम असून, चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्याने असे बौद्धिक कार्यक्रमही यानिमित्ताने आयोजित करायला हवेत.