नव्या मूर्तीसह सजावट साहित्य महागले

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

महापुराचा सांगली-कोल्हापुरातील यंदाच्या गणेशोत्सवालाही फटका बसला आहे. बहुतांश कलाकारांकडील गणेश मूर्तीचे पुराच्या पाण्यामुळे  मोठे नुकसान झाले आहे. पुरानंतरच्या कमी कालावधीत पुन्हा नव्याने मूर्ती तयार करणे अवघड असले, तरी सध्या त्यांची धावपळ सुरू आहे. दुसरीकडे गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या अन्य वस्तू, सजावट साहित्याच्या दुकानांचेही या महापुरात मोठे नुकसान झाले आहे. या हानीमुळे सांगलीत यंदा ‘श्रीं’च्या मूर्ती दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली असून सजावटीचे साहित्यही महागले आहे.

सांगलीकरांचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव आता दोन दिवसांवर आला असून घरगुती गणेशाची स्थापना करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मूर्तिकारांनी बाजारात विविध ठिकाणी तात्पुरते गाळे घेऊन श्रींच्या मूर्ती विक्रीसाठी मांडल्या आहेत. मात्र यंदा विक्रीसाठी आलेल्या मूर्तीची संख्या तुलनेने कमी आहे. अनेक कारागिरांकडील श्रींच्या मूर्तीचे महापुरात मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या व्यावसायिकांचा माल यंदा बाजारात येऊ शकलेला नाही. काहींनी महापुरानंतर गणेशोत्सवापर्यंतच्या कमी कालावधीत पुन्हा नव्याने मूर्ती तयार करण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र एकूणच यामुळे शहरातील मूर्तीच्या संख्येत यंदा घट झाली आहे. ही कमतरता बाहेरील व्यापाऱ्यांकडून येणाऱ्या गणेश मूर्तीकडून भरून निघेल असेही काहींचे म्हणणे आहे.

दरम्यान सार्वजनिक मंडळांच्या मोठय़ा मूर्तीचेही या महापुरात नुकसान झाले आहे. या मूर्तीचे रंगकाम, सजावटीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे नव्याने दिलेले रंग सुकण्यासाठी पुरेसे ऊन नसल्याने अनेक ठिकाणी प्रखर दिव्यांचा वापर केला जात आहे.

 

दरवर्षी एप्रिलपासून गणेश मूर्ती तयार करण्यास सुरुवात करतो. यंदाही सुमारे बाराशे मूर्ती तयार केल्या होत्या. उन्हात वाळल्याही होत्या. अंतिम रंगकाम करणे बाकी असतानाच महापूर आल्याने अनेक मूर्ती खराब झाल्या. पुन्हा नव्याने मूर्ती तयार करणे, सुकविणे आणि कमीत कमी वेळेत रंगकाम करणे अशक्य होते. तरीही परंपरेने मूर्ती खरेदी करणारे श्रद्धाळू असल्याने मिळेल ती साधने जमा करून मूर्ती पुन्हा तयार केल्या. सांगली शहरात गावभागामध्ये सुमारे आठ ते दहा कारागीर असून महापुराने त्यांच्या बहुसंख्य गणेश मूर्ती खराब झाल्या असून त्यांनी पेणहून काही मूर्ती विक्रीसाठी आणल्या आहेत. मात्र मागणीप्रमाणे मूर्ती उपलब्ध होण्यातही अखेरच्या क्षणी अडचणी भासत आहेत.

– विश्वेश म्हैसकर, गणेश मूर्तिकार, सांगली.

 

दरम्यान गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या अन्य वस्तू, सजावट साहित्याच्या दुकानांचेही या महापुरात मोठे नुकसान झाले आहे. या हानीमुळे सजावटीचे साहित्यही महागले आहे. काही व्यापाऱ्यांनी बाहेरून मालाची खरेदी करत त्याची विक्री सुरू केली आहे.