लोकमान्य टिळकांनी समाजजागृतीच्या उद्देशाने सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील ‘समाजकारण’ आता जवळपास संपले असून आता त्यात अर्थकारणच मुख्य बनले आहे. आता तरी गणेशोत्सवाची उलाढाल हजार कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. मुंबईतील काही मोठय़ा गणेशोत्सव मंडळांची उलाढाल प्रत्येकी काही कोटी रुपयांवर गेली आहे. तर छोटी मंडळेही लाखांची भरारी घेऊ लागली आहेत.
गणेशभक्तांमध्ये मानाचे स्थान मिळविलेल्या ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ची गेल्या वर्षीची उलाढाल २६ कोटी रुपये होती. गेल्या वर्षी मंडळाला सुमारे सव्वासात कोटी रुपये खर्च आला होता. मात्र ग्रंथालय, पुस्तकपेढी, संगणक केंद्र, योग केंद्र, डायलिसिस सेंटर, यूपीएससी मागर्दर्शन, रुग्ण सहाय्य निधी योजना, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा वर्ग या सर्वाचा वर्षभराचा खर्च मिळून एकूण उलाढाल २६ कोटी रुपयांच्या घरात गेली. यंदाची एकूण उलाढाल ३० कोटींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार यांनी व्यक्त केला.
भव्य गणेशमूर्ती, देखावा आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मुंबईचा राजा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळा’ची उलाढाल ७५ लाखांच्या आसपास होती. यंदा ती एक कोटीवर जाईल, असा अंदाज मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांनी व्यक्त केला आहे. दरवर्षी मंडळातर्फे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा वाटप, शिष्यवृत्ती वाटप, विद्यार्थी गुणगौरव आदी उपक्रम मोठय़ा प्रमाणावर राबविण्यात येतात. पुढील वर्षी पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याचा संकल्प मंडळाने सोडला आहे.
यंदा ६७ वे वर्ष साजरे करीत असलेल्या उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळाची उलाढाल झपाटय़ाने वाढली आहे. संपूर्ण उमरखाडी परिसरातील रहिवाशी या गणेशोत्सवासाठी सढळहस्ते वर्गणी देतात. मात्र प्रत्येक घरातून २०० रुपये वर्गणी घेण्याचा मंडळाचा दंडक आहे. रहिवाशांकडून जमा होणारी वर्गणी सुमारे सहा लाख रुपये असते. तसेच स्मरणिका आणि जाहिरातींच्या माध्यमातूनही बऱ्यापैकी निधी जमा होतो. याच्या जोरावर मंडळाने गेल्या वर्षी सुमारे १५ लाख रुपयांची उलाढाल केली. यंदा ही उलाढाल १७ लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. वाढती महागाई आणि जाहिरातदारांनी आखडता घेतलेला हात यामुळे उलाढालीवर परिणाम झाला आहे. पण तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत उलाढल अधिकच असेल, असे मंडळाचे उपाध्यक्ष कमलेश भोईर म्हणाले. वर्षभर आरोग्य शिबीर, महिलांसाठी महालक्ष्मी दर्शन यात्रा, तरुणांसाठी विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्याख्यानमाला, गुणगौरव अशा विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून मंडळाचे उपक्रम सुरू असतात.
‘आधार’ संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारे निकदवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यंदा ८६ वे वर्ष साजरे करीत आहे. शाडूची भव्य मूर्ती हे या मंडळाचे वैशिष्टय़. गिरगाव आणि आसपासच्या परिसरात मानाचे स्थान मिळविलेल्या या मंडळाची गेल्या वर्षीची उलाढाल २० लाख रुपयांच्या आसपास होती. वाढती महागाई, जाहिरातदार आणि नेत्यांनी घेतलेला आखडता हात अशा परिस्थितीतही यंदाच्या उलाढालीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ होईल, अशी अपेक्षा मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल देसाई यांनी व्यक्त केली आहे. अन्य मंडळांप्रमाणे रहिवाशांकडून मिळणारी वर्गणी, हितचिंतकांच्या जोरावर प्रसिद्ध केली जाणारी स्मरणिका, कंपन्यांकडून मिळणाऱ्या जाहिरातीतून मंडळाच्या तिजोरीत निधी जमा होता. पण मंडळाने आपली एक जागा भाडय़ाने दिली असून त्याद्वारेही मंडळाला वर्षांकाठी चांगले उत्पन्न मिळते.
जगभरातील गणरायाच्या आगळ्या वेगळ्या मूर्तीचे दर्शन घडविणारे मंडळ अशी अखिल मुगभाट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची ख्याती होती. पर्यावरणस्नेही भव्य गणेशमूर्ती साकारण्यासाठी मूर्तीकार आणि कारागिर मिळणे अवघड झाले आणि विदेशातील गणरायाच्या दर्शनास गिरगावकर मुकले. दोन वर्षांपासून हे मंडळ मंदीच्या चक्रात अडकले आहे. दोन वर्षांपूर्वी मंडळाची ए्रकूण उलाढाल १४ लाख रुपयांच्या घरात होती. परंतु गेल्या वर्षी महागाईचा फटका बसला आणि आर्थिक मदत आटली. परिणामी उलाढाल १०.४० लाख रुपयांवर घसरली. यंदाही फारशी चांगली  परिस्थिती नाही. त्यामुळे रोषणाई, सजावट आदींमध्ये हात आखडता घ्यावा लागला आहे. असे असले तरी यंदा उलाढाल ११ लाखांच्या आसपास जाईल, असा अंदाज मंडळाचे अध्यक्ष नीलेश उर्फ बाळा अहिरेकर यांनी व्यक्त केला.