पुण्यात गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची मागणी वाढली असली, तरी प्रत्यक्षात मात्र पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्तीची शहरात वानवा असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण बाजारात शाडू मातीच्या मूर्ती मिळत असल्या तरी त्या रंगविण्यासाठी मात्र सिंथेटिक रंग वापरले जात आहेत. बाजारात येणाऱ्या शाडू मातीच्या मूर्तीपैकी ९९ टक्के मूर्ती सिंथेटिक रंगांनी रंगवलेल्या आहेत.
शाडूची मूर्ती आणि त्याला वापरलेला नैसर्गिक रंग अशा मूर्ती पर्यावरणपूरक मानल्या जातात. हे रंग तयार करण्यासाठी झाडाची पाने, फुले किंवा हळद यांसारख्या माध्यमांचा वापर केला जातो. त्यांच्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नसतो, पाण्याचे फारसे प्रदूषणही होत नाही. मात्र, हे रंग बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे ते मुद्दाम तयार करावे लागतात. याऊलट सिंथेटिक रंग किंवा वॉटर कलर्स बाजारात सहज उपलब्ध असतात. या रंगांमध्ये अनेक प्रकारच्या छटा उपलब्ध असतात. नैसर्गिक रंगांमध्ये रंगाच्या छटांवर मर्यादा येते. याच कारणांमुळे मूर्तिकार सिंथेटिक रंगांना प्राधान्य देतात, अशी माहिती पुण्यातील मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांनी दिली. तसेच हळदीच्या रंगाने पितांबर रंगवलेल्या गणपतीपेक्षा पिवळ्या सिंथेटिक रंगाने रंगवलेले पितांबर असलेला गणपती अधिक आकर्षक दिसत असल्यामुळे ग्राहकदेखील याच मूर्तीना पसंती देतात.
शाडूची म्हणून विकली जाणारी गणेश मूर्ती पूर्णपणे मातीची असतेच असेही नाही. अनेक ठिकाणी विविध आकारांमध्ये बसलेले गणपती पहायला मिळतात. हे आकार मातीमधून साकारणे अवघड असल्याने त्यासाठी ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’चा वापर केला जातो. तसेच, काही ठिकाणी मूर्ती तयार करताना निम्मी माती व निम्मे प्लॅस्टर वापरले जाते. मूर्ती अधिक आकर्षक दिसावी यासाठी गणपतीच्या मूर्तीला अंगाचा रंग दिल्यानंतर त्यावर चमकी (वॉटर पर्ल पावडर) फवारली जाते. ही पावडरही सिंथेटिकच असते. तसेच मूर्तिवर रंग धरावा यासाठी रंग फेविकॉलच्या पाण्यात मिसळून वापरला जातो. मूर्तीवर चमकीची पावडरही मारली जाते. या मूर्तीवर सिंथेटिक रंग, फेविकॉल, पर्ल पावडर यांचा वापर केला जातो. त्यामुले त्या पूर्णपणे पर्यावरणपूरक नसतात. फारच थोडय़ा प्रमाणात किंवा घरगुती पातळीवर अशा मूर्ती तयार केल्या जात आहेत, असे काही मूर्तिकारांनी सांगितले.