20 January 2018

News Flash

‘एचआयव्ही’ च्या गोंधळातून ‘मुक्त’ करणारी ‘हेल्पलाइन’

‘एचआयव्ही’ या शब्दांबरोबरच विविध भावभावनांचा कल्लोळ नाही झाला तरच नवल. एचआयव्ही रोगापेक्षाही ‘एचआयव्ही’ हा शब्द अधिक क्लेषदायक वाटतो. ‘एचआयव्ही’ झालेला नसतानाही बाधित आहोत की काय?

श्रीराम ओक-shriramoak@gmail.com | Updated: February 2, 2013 6:05 AM

‘एचआयव्ही’ या शब्दांबरोबरच विविध भावभावनांचा कल्लोळ नाही झाला तरच नवल. एचआयव्ही रोगापेक्षाही ‘एचआयव्ही’ हा शब्द अधिक क्लेषदायक वाटतो. ‘एचआयव्ही’ झालेला नसतानाही बाधित आहोत की काय? ही भीती जशी मानसिक स्वास्थ बिघडवायला कारणीभूत ठरू शकते तसेच अपुरी, चुकीची माहिती आणि त्यामुळे होणारी हानी एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या जीवनात वादळ निर्माण करू शकतात. काही वेळा क्षणिक मोह किंवा कोणतीही चुक नसताना देखील ‘एचआयव्ही’ ची लागण झालीच, तर योग्य उपचार, उपाययोजनांच्या माहितीअभावी त्या रुग्णाचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण देखील होऊ शकते. मोकळेपणाने या विषयावरची माहिती घेता येत नाही, एचआयव्ही बाधित झालो असू का? ही भीती आणि सुयोग्य माहिती कोणाकडून मिळेल हे देखील अनेकदा समजत नाही आणि त्यामुळे होणारा मानसिक गुंता अधिक वाढत जातो. पॉझिटिव्ह नसतानाही असल्याची जशी भीती तसेच पॉझिटिव्ह झाल्यानंतर कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक यांना जर समजले तर ही भीती देखील तितकीच त्रासदायक.
एचआयव्ही म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? रक्तदान केल्याने एचआयव्ही होतो का? दाढीच्या ब्लेडच्या एकत्रित वापरामुळे तो होतो का? एचआयव्ही बाधित व्यक्तींच्या संपर्कामुळे, हस्तांदोलनामुळे एचआयव्ही होतो का? एचआयव्ही बाधित व्यक्तींचे विवाह होतात का? त्यांची मुले देखील बाधित होतात का? अशा विविध प्रश्नांचा कल्लोळ जर असेल, तर मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन या सामाजिक संस्थेची ‘संवाद हेल्पलाइन’ उपयुक्त ठरू शकते. ५ ऑक्टोबर २००५ रोजी १ समुपदेशक, १ दूरध्वनीची लाइन याच्या माध्यमातून सुरू झालेली ही हेल्पलाइन आता १२ समुपदेशक, १० दूरध्वनी लाइन्ससह काम करते आहे. सकाळी ९.३० ते रात्री ८.३० या वेळेत ०२०-२६३८१२३४ या क्रमांकावर ‘एचआयव्ही’च्या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. सुयोग्य माहितीबरोबरच विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची योग्य दखल देखील ही हेल्पलाइन घेते. ‘एचआयव्ही’ च्या संदर्भातील सखोल माहिती, ‘एचआयव्ही’ झाला असल्याची शंका असो अथवा ‘एचआयव्ही’ संदर्भातील उपाययोजना, त्याच्या चाचणीसंदर्भातील माहिती असो ती या हेल्पलाइनवर मिळू शकते. ‘संवाद’ हेल्पलाइन सध्या महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यातून चालविली जाते. या हेल्पलाइनने आजपर्यंत १ लाख ३५ हजार जणांचे आयुष्यात परिवर्तन करणारे कॉल्स घेतले आहेत. अनेकांचे मोडणारे संसारच नाहीत तर ठणठणीत आणि सुदृढ आयुष्य जगू शकतील पण केवळ भीतीपोटी आत्महत्येस प्रवृत्त झालेल्यांची आयुष्ये देखील या हेल्पलाइनमुळे वाचली आहेत.
आत्महत्या करण्यासाठी इमारतीवर उभ्या असलेल्या ‘त्या’ तरुणाला मृत्यूला कवेत घेण्यापूर्वी या हेल्पलाइनवर कॉल करण्याची व मरताना आपले मन मोकळे करण्याची इच्छा काय झाली आणि एक जीव वाचला! आपण एचआयव्ही बाधित आहोत, अशी भीती त्या तरुणाला वाटत होती, पण..‘एचआयव्ही’ पासून कोसो दूर असलेला हा तरुण वाचू शकला याचे सारे श्रेय या हेल्पलाइनलाच द्यावे लागेल. एका पार्टीत झालेल्या छोटय़ाशा वाटणाऱ्या चुकीमुळे आपल्याला आयुष्यभरासाठी ‘एचआयव्ही’ पदरात पाडून घेतल्याचे शल्य त्या तरुणाला टोचत होते. पण संवाद हेल्पलाइनशी एकदा बोलणे झाल्यानंतर त्याला चाचण्यांसंदर्भात तर माहिती मिळालीच, पण त्याबरोबरच प्रत्येक वेळी धीर दिला, त्याला चाचण्यांसाठी प्रवृत्त केले ते या हेल्पलाइनच्या समुपदेशकानेच. संवाद हेल्पलाइनचे कार्यकर्ते या चाचण्यांच्या वेळी, रिपोर्ट आणताना प्रत्यक्ष जरी त्याच्याबरोबर नसले, तरी दूरध्वनी सेवेच्या, आवाजाच्या माध्यमातून ते त्या तरुणाजवळ होते. एक वर्षांहून अधिक काळ या हेल्पलाइनच्या समुपदेशकांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे तसेच योग्य माहिती आणि धीराच्या सान्निध्यामुळे आज तो तरुण निरोगी आयुष्य जगत आहे आणि त्यामुळे अर्थातच तरुण मुलगा गमवल्याच्या दु:खातून त्याच्या पालकांची सुटका झाली आहे.    
वयाच्या १२ व्या वर्षी एका मुलीवर नातेवाइकाकडूनच झालेल्या बलात्काराचे मानसिक घाव झेलत ती मुलगी वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंत आली, पण वेगवेगळ्या शारीरिक व्याधी घेऊनच. त्या व्याधीचा उगम त्या बलात्कारात असल्याची आणि आपण ‘एचआयव्ही’ बाधित झालो असल्याची भावना मनात रुजल्यामुळे तिची मानसिक अवस्था अधिकच बिकट होत गेली. या अस्वस्थतेचा एकदा उद्रेक झाला आणि तो तिने संवाद हेल्पलाइनच्या समुपदेशकाला बोलून दाखवला. प्रत्यक्षात एचआयव्ही नसलेली ती तरुणी त्या वेळी मात्र डिप्रेशन स्टेजला पोहचली होती. ‘संवाद’च्या समुपदेशकांच्या पंधरा ते वीस दिवसांच्या समुपदेशन आणि सुयोग्य मार्गदर्शनामुळे आज त्या मुलीची मानसिक घालमेल थांबली आहे. या काळात रोज एक ते दीड तासाच्या दूरध्वनीवरून होणाऱ्या चर्चेतून, बोलण्यातून तिच्या मानसिक व्याधीपासून तिला दूर ठेवण्यात या हेल्पलाइनच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले आहे. लग्नानंतरच्या काही काळानंतर ‘एचआयव्ही’ बाधित पती, पत्नीला आपण पॉझिटिव्ह झाल्याचे सांगूही शकत नव्हता आणि त्यावर योग्य उपचार आणि उपाययोजनाही करू शकत नव्हता. आपला संसार कोलमडून पडेल की काय? या भीतीने त्याला ग्रासले होते. सत्याला सामोरे जाण्याची हिंमत तो हरवून बसला होता, पण पुन्हा एकदा संवाद हेल्पलाइन त्याच्या मदतीला धावून आली आणि त्यामुळे पत्नीला ‘एचआयव्ही’ होण्यापासून तर तो वाचवू शकलाच, पण योग्य उपचारांमुळे चांगले जीवन जगण्याबरोबरच संसार देखील वाचवू शकला. नाव, पत्ता न सांगता मनातला एचआयव्हीसंबंधी प्रश्न विचारण्याची मुभा या हेल्पलाइनमध्ये मिळते. दूरध्वनी करणाऱ्याच्या मनातील सर्व शंका दूर व्हाव्यात यासाठी येथील समुपदेशकाला विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षिण दिलेले असते. कधी-कधी तासतासभरही सुरू असणाऱ्या कॉलला न थकता, न कंटाळता, न चिडता सुयोग्य माहिती देण्याचे कसब त्या समुपदेशकांना आत्मसात करावे लागते.
संवाद हेल्पलाइनाला येणारे कॉल्स केवळ शहरातूनच येतात असे नाही तर ग्रामीण भागातून देखील अनेक जण या हेल्पलाइनचा उपयोग करून घेतात. दिवसाला नव्वद ते शंभर कॉल्सवरील माहिती घेण्यास उत्सुक असणाऱ्यांचे समाधान सध्या ही हेल्पलाइन करते आहे. तरुण-प्रौढ, स्त्री-पुरुष, विवाहित-अविवाहित, विधुर-विधवा अशा सगळ्यांचेच कॉल्स यामध्ये येतात. एचआयव्हीसंबंधी प्राथमिक माहिती घेण्याबरोबरच वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी या हेल्पलाइनची मदत घेतली जाते. लग्न ठरताना एचआयव्हीच्या चाचण्या, समुपदेशन यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक जण या हेल्पलाइनचा विनियोग करून घेतात. येथे येणारा प्रत्येक नवीन कॉल हा वेगवेगळे प्रश्न आणि वेगवेगळ्या भावनांसह येतो. काही कॉल नि:शब्द आणि दीर्घ शांतता घेऊन तर काही रडण्याने सुरू होतात. काही संभ्रमित अवस्थेत आणि हळू आवाजात येतात. काही कॉल्स समुपदेशकांवर विश्वास बसला की, नंतर खूप वेळ चर्चा करणारे असतात, तर काही केवळ पटकन आणि जुजबी माहिती घेऊन संपवून टाकण्याकडे कल असलेले असतात.
एचआयव्हीसंदर्भातील समज-गैरसमज दूर करण्याबरोबरच नकोसे झालेल्या आयुष्याला उभारणी देणारे काम संवाद हेल्पलाइनमार्फत होत असताना, ज्यांना समोर दूरध्वनी आहे, हातात मोबाइल आहे, पण करण्याची भीती वाटते किंवा हेल्पलाइनची मदत घेऊ शकत नाहीत अशांसाठी देखील विविध सेवा या हेल्पलाइनच्या माध्यमातून दिल्या जातात.
‘आशा’ हा प्रकल्प एचआयव्ही बाधित रुग्णांना एचआयव्ही झाल्यानंतर घ्यायची काळजी, एआरटी चाचण्याचे महत्त्व, आहार, मानसिक स्वास्थ, आरोग्यविषयक माहिती आणि एचआयव्ही बाधित व्यक्तींना मदत देणाऱ्या संस्थांचे संदर्भ देण्याकरिता चालविला जातो. तर ‘संपर्क’ हा उपक्रम ग्रामीण भागातील अशिक्षित स्त्रिया आणि पुरुषांना मोफत मोबाइल कॉलची सुविधा देऊन त्याद्वारे एचआयव्हीविषयी सर्व माहिती देण्याकरिता राबविला जातो. याचबरोबर जेव्हा संवाद हेल्पलाइनचे फोन व्यस्त असतील, त्या वेळी निकड असलेल्या व्यक्तींसाठी ‘कॉलबॅक सव्‍‌र्हिस’ देखील आहे. एचआयव्ही बाधित रुग्णांना औषधे वेळेत घेण्याची आठवण करणारी ‘एसएमएस रिमांयडर’सारखी सुविधा देखील दिली जाते. अशा रीतीने एचआयव्ही बाधित व्यक्तींबरोबर एचआयव्ही न झालेल्या व त्यापासून दूर राहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी संवाद हेल्पलाइनची सकारात्मकतेच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.

First Published on February 2, 2013 6:05 am

Web Title: helpline on hiv chaos
टॅग Health,Helpline,Hiv
  1. No Comments.