‘अँजिओग्राफी’, ‘अँजिओप्लास्टी’ आणि ‘बायपास’.. हे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात खरे, पण त्याविषयी पुरेशी माहिती मात्र मिळत नाही. अगदी अँजिओग्राफी सुद्धा कुठलीतरी शस्त्रक्रियाच असावी असा बऱ्याच जणांचा समज असतो. बायपास म्हटले की लोक अक्षरश: भीतीने गठाळूनच जातात, आणि अँजिओप्लास्टीतला ‘स्टेंट’ म्हणजे नेमके काय याविषयीही अनेकांना शंका असतात. या शंकांचे निरसन करण्याचा हा एक प्रयत्न.
अँजिओग्राफी- ‘अँजिओग्राफी’ ही उपचारपद्धती नव्हे, तर ती एक तपासणी आहे हे लक्षात घ्यायला हवे. ‘स्ट्रेस टेस्ट’ किंवा ‘एकोकार्डिओग्राफी’ या तपासण्या थेट हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या नसतात, तर रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या गुठळ्यांमुळे होणारे दुष्परिणाम त्यात दिसतात. अँजिओग्राफीत मात्र हृदयाच्या स्नायूला रक्तपुरवठा देणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये (कोरोनरी आर्टरीज) गाठी निर्माण झाल्या आहेत का, हे पाहायचे असते. आपल्या शरीरात हृदयापासून निघालेली महारोहिणी रक्तवाहिनी छातीपर्यंत आणि पुढे बेंबीच्या आसपास येते आणि तिथे तिचे दोन भाग होऊन एक भाग उजव्या पायात व एक भाग डाव्या पायात गेलेला असतो. अँजिओग्राफीत यातील सहसा उजव्या रक्तवाहिनीतून एक सूक्ष्म रबरी नळी घातली जाते आणि ही नळी रक्तप्रवाहाच्या उलटय़ा मार्गाने जाऊन हृदयाभोवतीच्या रक्तवाहिन्यांमध्ये ढकलली जाते. या नळीचे जे टोक बाहेरच्या बाजूला असते त्यातून ‘क्ष किरण’तपासणीत दिसून येईल असे एक प्रकारचे औषध घातले जाते आणि त्याच वेळी तपासणीचे वेगवेगळ्या कोनांनी अंतर्गत चित्रण घेतले जाते.
ही तपासणी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी आहे की नाही याचे शंभर टक्के निदान करते. नेमक्या कोणत्या रक्तवाहिनीत, कुठे आणि किती टक्के ‘ब्लॉक’ आहे, एकाहून अधिक रक्तवाहिन्यांत गुठळ्या आहेत का, याची माहिती या तपासणीत कळते.
अँजिओप्लास्टी- ‘अँजिओप्लास्टी’ ही खरे तर शस्त्रक्रिया- म्हणजे ‘सर्जरी’ नाहीच. त्यात कापाकापी नसते व ती एक ‘सर्जिकल प्रोसिजर’ आहे. अँजिओप्लास्टीच्या प्राथमिक संकल्पनेनुसार गुठळी झालेल्या रक्तवाहिनीत अँजिओग्राफीच्या रबरी नळीसारखीच एक ‘गाईड वायर’ ढकलली जाते आणि या वायरवरून एक फुगा जाऊन गुठळी असलेल्या ठिकाणी तो फुगवला जातो. फुगा फुगला की गुठळीच्या ठिकाणी असलेले स्निग्ध पदार्थ चपटे होऊन रक्तवाहिनीच्या बाजूला सरकतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. पूर्वी अँजिओप्लास्टीत एवढीच पद्धत वापरली जाई, पण पुढे त्यात सुधारणा होत गेल्या आणि ‘स्टेंट’ची कल्पना आली.
स्टेंट- गुठळी झालेली रक्तवाहिनी केवळ फुग्याने फुगवून सोडून दिली तर रक्तवाहिनी नाजूक झाल्यामुळे तिथे स्निग्ध पदार्थ पुन्हा जमा होण्याचा धोका असतो. त्यामुळे अँजिओप्लास्टीत ‘स्टेंट’ वापरले जाऊ लागले. स्टेंट म्हणजे एक प्रकारची स्प्रिंग. एकदा फुग्याने रक्तवाहिनी फुगवल्यानंतर दुसऱ्या एका फुग्यावर बसवलेला स्टेंट त्या रक्तवाहिनीत आत ढकलला जातो. बरोबर गुठळीच्या जागी हा फुगा फुगवला जातो आणि त्यावरची स्प्रिंग उघडली जाते. यामुळे रक्तवाहिनीच्या बाजूला सरकवले गेलेले स्निग्ध पदार्थ तिथून हलण्यास मज्जाव होतो. पूर्वी हे स्टेंट अगदी साध्या धातूच्या स्प्रिंगसारखे असत. त्याला ‘बेअर मेटल स्टेंट’ म्हटले जाई. पण शेवटी हा स्ट्रेंट शरीरासाठी बाहेरून आलेला पदार्थ असल्यामुळे त्यातच रक्तपेशी जमा होऊन तिथे पुन्हा गुठळी निर्माण होऊ शकत होती. मग नव्या पद्धतीचे ‘ड्रग इल्युडिंग स्टेंट’ आले. या स्टेंटच्या आत एक प्रकारचे औषध असते आणि स्टेंट रक्तवाहिनीत घातल्यावर हे औषध त्यात पेशी जमा होण्यापासून अटकाव करते. आता सगळीकडे असा ड्रग इल्युडिंग स्टेंटच वापरला जातो. अँजिओप्लास्टीत साधारणत: रुग्णाला केवळ तीन रात्री रुग्णालयात राहावे लागते. शिवाय आणखी २-३ दिवस विश्रांती घेतल्यावर आठवडय़ाभरात तो कामावर रुजू होऊ शकतो.
‘बायपास’- ‘बायपास’ म्हणजे ‘ओपन हार्ट सर्जरी.’ यात प्रत्यक्ष रक्तवाहिनीतील गुठळीला हात न लावता गुठळीच्या पुढे नवीन रक्तवाहिनीचे जोडकाम केले जाते. आता हृदयाचे ठोके सुरू असतानाच त्याचा केवळ जोडकाम करण्याचा भाग स्थिर करून तिथे शस्त्रक्रिया करता येते. बायपासमध्ये रुग्णाची छाती उघडी करून तिथले हाड कापावे लागते, शस्त्रक्रियेसाठी ४ तासांचा अवधी लागतो, साधारणपणे दहा दिवस रुग्णाला रुग्णालयात राहावे लागते व पुढे महिनाभर विश्रांतीही घ्यावी लागते. त्यामुळे ‘बायपास’ म्हटले की लोकांची धास्ती सुरू होते आणि त्यासाठी मनाची तयारी होत नाही.
‘अँजिओप्लास्टी’ कधी आणि ‘बायपास’ कधी? – पूर्वी एका रक्तवाहिनीत गुठळी असल्यास अँजिओप्लास्टी करून स्टेंट घातला जात असे व २-३ रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या असतील तर बायपास शस्त्रक्रिया केली जात असे. पण आता तसे राहिलेले नसून अँजिओप्लास्टी करणे अजिबातच शक्य नसते किंवा धोक्याचे असते त्या रुग्णांमध्ये बायपासचा निर्णय घेतला जातो. आता चांगल्या दर्जाचे स्टेंट बाजारात आले आहेत. एकाच रुग्णाला रक्तवाहिन्यांत ५-६ ठिकाणी गुठळ्या असतानाही अँजिओप्लास्टी करून तितके स्टेंट बसवले गेल्याची उदाहरणे आहेत. एकदा स्टेंट बसवल्यावर तो साधारणत: १० ते १५ वर्षे चालतो. बायपाससाठीही हा कालावधी १० ते १५ वर्षांचा सांगितला जातो. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्याच किंवा दुसऱ्या रक्तवाहिनीत गुठळी निर्माण झाल्यास पुन्हा अँजिओप्लास्टी करता येते. अगदी बायपास शस्त्रक्रियेनंतरही गुठळी झाली तरीही अँजिओप्लास्टी करता येऊ शकते. असे सगळे असले तरी अँजिओप्लास्टी कधी करावी व बायपास कधी करावी याचा निर्णय डॉक्टर प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार घेत असतात व तो वेगवेगळा असू शकतो.
अँजिओप्लास्टी केल्यानंतरही पथ्य हवेच- अँजिओप्लास्टी ही रुग्णांना फारशी काळजीची वाटत नसल्यामुळे ती झाल्यानंतर रुग्ण खाण्यापिण्याचे कुपथ्य, व्यायामाचा अभाव अशा जीवनशैलीत परत जातात आणि रक्तवाहिन्यांमध्ये पुन्हा गुठळी होण्याची शक्यता निर्माण होते. बायपासची मात्र भीती बसल्यामुळे रुग्ण नंतरही पथ्य पाळताना दिसतात.

खर्चाचे काय?
अँजिओग्राफी तपासणीसाठी खासगी रुग्णालयांमध्ये साधारणत: १० ते १५ हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो. बायपास शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च अंदाजे तीन लाखाच्या आसपास असतो. हा खर्च ‘जनरल वॉर्ड’ निवडणाऱ्या रुग्णांसाठीचा आहे. अँजिओप्लास्टीत अंदाजे दोन स्टेंट घालण्यासाठी येणारा खर्चही याच आसपास असतो. मात्र स्टेंटच्या किमती २५ ते ३० हजार रुपयांपासून १ लाख ३० हजारांपर्यंत आहेत. स्टेंट शरीरात घालणे किती सोपे आहे, तो काम कसे करतो, त्यात वापरलेले औषध या विविध गोष्टींवर या किमती अवलंबून असतात. कमी किमतीचा स्टेंट सुद्धा निरुपयोगी निश्चितच नसतो. पण हृदयातल्या रक्तवाहिन्यांमध्ये काही विशिष्ट ठिकाणी आधुनिक स्टेंट घालणे अधिक सोपे जाते व त्यातील गुंतागुंती कमी होतात. एखाद्या रुग्णाला २-३ ठिकाणी स्टेंट घालावे लागणार असतील आणि त्याचे आर्थिक गणित जमत नसेल तर प्रमुख व अधिक महत्वाच्या रक्तवाहिनीत आधुनिक स्टेंट आणि लहान रक्तवाहिनीत कमी किमतीचा स्टेंट घालूनही चालू शकते. आता शरीरात विरघळणारा ‘बायोडीग्रेडेबल स्टेंट’देखील बाजारात आला आहे परंतु त्यांची किंमत एक लाखाच्या पुढे असते, शिवाय अगदी लहान रक्तवाहिन्यांमध्ये हे बायोडीग्रेडेबल स्टेंट घालता येत नाहीत.

what is onigiri
घाम मिसळलेला ‘हा’ पदार्थ चाखला आहात का? नक्की हा विषय का ठरतोय चर्चेचा?
Conversations Between Human and Machines
कुतूहल : भाषापटू यंत्रांची करामत
Stree Vishwa Virtual trend of trad wife
स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?

 

– डॉ. अविनाश इनामदार,
हृदयरोगतज्ज्ञ.
(शब्दांकन- संपदा सोवनी)