काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या आयपीएलच्या ११ व्या हंगामाची रंगत दिवसागणिक वाढतच आहे. अशा या क्रिकेटच्या महाकुंभात गेली कित्येक पर्व आपल्या कामगिरीने चमकणारे खेळाडू म्हणजे विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स. मैदानात या खेळाडूंचा असणारा वावर फक्त चाहत्यांनाच नव्हे, तर विरोधी संघातील खेळाडूंनाही बऱ्याचदा प्रोत्साहित करतो. सध्याच्या घडीला हे दोघंही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघातून खेळत असून, यंदाच्या हंगामातही त्यांच्या प्रदर्शनावरच सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या दोन्ही खेळाडूंची क्षमता आणि खेळावर असणारं प्रभुत्त्व पाहता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील माजी खेळाडू आणि आरसीबीचा बॅटिंग कोच ट्रेंट वुडहिल याने त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

एबीडी आणि विराट या दोघांचीही तुलना त्याने टेनिस या खेळातील रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दिग्गज खेळाडूंशी केली आहे. दोघांचंही कौशल्य आणि क्रिकेटकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन या दोन्ही गोष्टी त्यांना फेडरर आणि नदालची उपमा देण्यास भाग पाडतात.

एबी डिव्हिलियर्स हा जागतिक क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत पुढे आहे. मैदानात कोणत्याही दिशेला चेंडू भिरकावण्याच्या त्याच्या कौशल्याने वुडहिल भारावला असून, विराटच्या शारीरिक सुदृढतेने त्याला प्रभावित केलं आहे.
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार माध्यमांशी संवाद साधतेवेळी कोहली हा पहिलाच खेळाडू आहे ज्याच्यामुळे मी सर्वाधिक प्रभावीच झालो. नदाल, फेडरर, ख्रिस्तीयाने रोनाल्डो आणि मेसी या खेळाडूंप्रमाणेच तो खूप चपळ आहे. क्रिकेटकडे तो मोठ्या गांभिर्याने पाहतो, असं वुडहिलने सांगितलं. सोबतच त्याने एबीडीचंही तोंड भरुन कौतुक केलं. या दोन्ही खेळाडूंना खेळताना पाहून एक वेगळीच अनुभूती होते, असंही त्याने स्पष्ट केलं.

वाचा : मित्राच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे सचिन मुंबईच्या रस्त्यावर खेळला क्रिकेट

विराट आणि एबीडीविषयीचं वुडहिलचं मत हे त्यांच्यासाठी प्रेणादाई ठरेल यात शंका नाही. दरम्यान, २०११ पासून कोहली आणि डिव्हिलियर्स आयपीएकमध्ये बंगळुरुच्या संघातून एकत्र खेळत आहे. आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही स्टार क्रिकेटपटूंनी आपल्या फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना अनेक आनंदाचे क्षण दिले आहेत. आयपीएलमध्ये कोहली आणि डिव्हिलियर्सने दोनवेळा दोनशे धावांची भागीदारी केली आहे. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये अशी विक्रमी भागिदारी करणारी जगातील ही एकमेव जोडी आहे.