भेदक गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबविरोधात १३३ या माफक धावसंख्येचा बचाव केला. १३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ केवळ ११९ धावाच करु शकला आणि त्यांचा १३ धावांनी पराभव झाला. पंजाबकडून ख्रिस गेल(२३) आणि लोकेश राहुल(३२) यांच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मैदानावर तग धरता आला नाही. हैदराबादकडून फिरकीपटू राशिद खानने सर्वाधिक ३ गडी बाद केले. संदीप शर्मा, बासिल थंपी आणि शाकिब हसन यांनी प्रत्येकी २ गडी खेळाडूंना तंबूत पाठवलं.

त्यापूर्वी घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाला किंग्ज इलेव्हन पंबाज संघाच्या गोलंदाजांनी २० षटकांत १३२ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पंजाबच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. अंकित राजपूतने हैदराबादच्या ३ फलंदाजांना ठराविक अंतराने माघारी धाडत, आघाडीची फळी कापून काढली. यानंतर मनिष पांडे आणि शाकीब अल हसन जोडीने अर्धशतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शाकीब अल हसन माघारी परतल्यानंतर हैदराबादच्या संघाला पुन्हा एकदा उतरती कळा लागली. एका बाजूने मनिष पांडेने संघाचा डाव सावरत अर्धशतक झळकावलं, मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

१३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या पंजाबचे सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांनी चांगली सुरूवात करुन दिली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर एकाही फलंदाजाला मैदानावर तग धरता आला नाही. हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि संघाला 13 धावांनी विजय मिळवून दिला. हैदराबादच्या तिखट माऱ्यापुढे पंजाबचा डाव 119 धावांवरच आटोपला. फिरकीपटू रशिद खानने चार षटकांत 19 धावा देत तीन फलंदाजांना बाद केले, तर संदीप सिंग, शकिब अल हसन आणि बासिल थम्पी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत हैदराबादच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

 

  • पंजाबला विजयासाठी अखेरच्या षटकात १५ धावांची गरज
  • ४ धावा काढून कर्णधार आर. अश्विन राशिद खानच्या गोलंदाजीवर झेलबाद, पंजाबला ९ वा धक्का
  • बरिंदर सरन वृद्धीमान साहाकडून धावबाद, पंजाबची आठवी विकेट
  • संदीप शर्माच्या गोलंदाजीवर अॅण्ड्र्यू टाय पायचीत, सातवा धक्का
  •  पंजाबची सहावी विकेट, मनोज तिवारी बाद, संदीप शर्माने घेतली विकेट
  • फिंच बाद, पंजाबचा निम्मा संघ माघारी
  • रशिद खानच्या गोलंदाजीवर करुण नायर पायचीत, पंजाबला चौथा धक्का
  • मयांक अगरवाल बाद, शकिब अल हसनने घेतली विकेट ,पंजाबला तिसरा धक्का
  • ठराविक अंतराने पंजाबचा दुसरा गडी माघारी, ख्रिस गेल बसिल थम्पीच्या गोलंदाजीवर झेलबाद
  • पंजाबला पहिला धक्का, राशिद खानच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल त्रिफळाचीत
  • पंबाजने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
  • गेल-लोकेश राहुलची मैदानाच्या चौफेर फटकेबाजी
  • लोकेश राहुल-ख्रिस गेलकडून पंजाबच्या डावाची आक्रमक सुरुवात
  • पंजाबला विजयासाठी १३३ धावांचं आव्हान
  • अखेरच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मोहम्मद नबी बाद, २० षटकात हैदराबादची १३२ पर्यंत मजल
  • अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करताना मनिष पांडे माघारी, हैदराबादला पाचवा धक्का
  • मनिष पांडेचं अर्धशतक
  • मुजीब रेहमानच्या गोलंदजीवर शाकीब अस हसन माघारी, हैदराबादला चौथा धक्का
  • अखेर हैदराबादची जमलेली जोडी फुटली
  • चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ५२ धावांची अर्धशतकी भागीदारी
  • दोन्ही फलंदाजांच्या सावध खेळीमुळे हैदराबादने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
  • मनिष पांडे-शाकीब अल हसन जोडीने हैदराबादचा डाव सावरला
  • मात्र नो बॉल असल्यामुळे शाकीबला जीवदान
  • बरिंदर सरनच्या गोलंदाजीवर शाकीब अल हसन झेलबाद
  • अंकित राजपूतचा हैदराबादला तिसरा धक्का, वृद्धीमान साहा माघारी
  • मनिष पांडे-वृद्धीमान साहा जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • ठराविक अंतराने शिखर धवन माघारी, हैदराबादला दुसरा धक्का
  • कर्णधार केन विल्यमसन भोपळाही न फोडता माघारी, अंकित राजपूतचा हैदराबादला पहिला धक्का
  • घरच्या मैदानावर हैदराबादच्या संघाची अडखळती सुरुवात
  • ख्रिस गेलचं पंजाबच्या संघात पुनरागमन
  • पंजाबने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय