वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर सनराईजर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज बिली स्टॅनलेक बोटाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात बिलीच्या बोटाला दुखापत झालेली होती. यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांतीही दिली. मात्र त्याची दुखापत बरी होत नसल्यामुळे अखेर बिलीने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने या निर्णयाची माहिती दिली आहे.

चेन्नईविरुद्ध सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर बिलीने भारत व ऑस्ट्रेलियातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. मात्र त्याच्या बोटाला झालेली दुखापत पाहता डॉक्टरांनी बिलीला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. यावरुनच स्टेनलेकने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील उपचारांसाठी बिली स्टॅनलेक तात्काळ आपल्या मायदेशी म्हणजेच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. २३ वर्षीय बिली स्टॅनलेकने आतापर्यंत ४ सामन्यांमध्ये ५ बळी मिळवले आहेत.