IPL ची सुरूवात २००८पासून झाली. देशातील वेगवेगळ्या ८ मोठ्या शहरांच्या नावांचे संघ तयार करण्यात आले. सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, युवराज सिंग यांसारख्या दिग्गज खेळाडूंना आपापल्या मूळ शहराच्या संघातून खेळायला मिळालं. काहींना आपली चमक दाखवता आली तर काहींना अपयश आले. २००९मध्ये गांगुलीला कोलकाता संघाच्या कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय मालक शाहरूख खान आणि संघ व्यवस्थापनाने घेतला. काही दिवसांत तो संघातूनही बाहेर गेला. अशाप्रकारे दिग्गज क्रिकेटपटूला संघातून काढणं हे खूप चुकीचं होतं असं मत बॉलिवूडचा गायक अभिजीत भट्टाचार्य याने व्यक्त केलं. तसेच IPLच्या कार्य़पद्धतीवरही ताशेरे ओढले.

“मी IPL बघण्यात माझा वेळ वाया घालवत नाही. त्यापेक्षा मी गल्ली क्रिकेट खेळतो, कारण त्यात माझं जास्त मनोरंजन होतं. शाहरूखने कोलकाताचा संघ बनवला आणि मग गांगुलीला संघातून काढून टाकलं. असं वाटलं की त्याला काढायलाच त्याने संघ विकत घेतला होता. सौरव गांगुलीने क्रिकेटमध्ये कर्णधाराची भूमिका काय असते साऱ्यांना दाखवून दिलं. पण नंतर किरण मोरे आणि ग्रेग चॅपल या लोकांनी त्याच्यावर टीका करून त्याचं मानसिक खच्चीकरण केलं. त्यानंतर शाहरूखने सांगितलं की त्याला काढून टाका आणि दुसऱ्याला कर्णधार करा. असं करणं खूप वाईट आणि चुकीचं होतं”, असं तो म्हणाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दलही त्याने आपलं मत व्यक्त केलं. “पूर्वी खेळाडू फलंदाजी करताना हेल्मेट्स वापरत नव्हते. अँडी रॉबर्ट्स, लिली, थॉम्पसन हे गोलंदाज भेदक मारा करायचे. आणि दुसऱ्या बाजूला सुनील गावसकरसारखा खेळाडू हेल्मेट न घालता चेंडू खेळायचा. तेव्हापासूनच तसे फलंदाज हिरो वाटायचे. त्याशिवाय एकनाथ सोलकरहेदेखील हिरो होते. हेल्मेट न घालता ते शॉर्ट लेगला फिल्डिंग करायचे आणि झकास कामगिरी करायचे. हल्लीचे खेळाडू हे पूर्णपणे सुरक्षा कवच घालून खेळतात. त्यामुळे त्यांना अपेक्षित आदर आणि सन्मान मिळत नाही”, असे तो म्हणाला.