एबी डिव्हीलियर्स आणि शिवम दुबे यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सविरुद्ध २०१ धावांचा डोंगर तयार केला. मधल्या षटकांत मुंबईच्या गोलंदाजांनी RCB च्या धावगतीवर अंकुश लावत सामन्यावर चांगलं वर्चस्व निर्माण केलं होतं. परंतू एबी डिव्हीलियर्सच्या फटकेबाजीने संपूर्ण सामन्याचं चित्रच पालटलं. मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत डिव्हीलियर्सने २४ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५५ धावा केल्या.

मुंबई इंडियन्सविरुद्ध डिव्हीलियर्सची कामगिरी ही चांगली राहिलेली आहे. याआधीच्या दोन सामन्यांमध्येही डिव्हीलियर्सने अर्धशतक झळकावलं होतं. तिच परंपरा कायम राखत डिव्हीलियर्सने दुबईत अर्धशतक झळकावलं.

अखेरच्या षटकांत शिवम दुबेनेही डिव्हीलियर्सला चांगली साथ दिली. १० चेंडूत १ चौकार आणि ३ षटकार लगावत दुबेने नाबाद २७ धावा केल्या. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने २ तर राहुल चहरने १ बळी घेतला.