लागोपाठ पराभवांमुळे गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर फेकल्या गेलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला अखेरीस विजयी सूर गवसला आहे. शारजाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाबने RCB वर ८ गडी राखून मात केली. आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिला सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या गेलने ४५ चेंडूत १ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ५३ धावा केल्या.

पंजाबच्या संघाने आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये ख्रिस गेलला संधी दिली नाही. मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल ही जोडी चांगला खेळ करत असल्यामुळे पंजाबने त्यांच्यावर विश्वास दाखवला. काही दिवसांपूर्वी गेलची तब्येत खराब झाल्यामुळे त्याला उपचारही घ्यावे लागले. मात्र या सर्वांवर मात करत गेलने दमदार पुनरागमन करत आजही आपल्यात आधीसारखाच फॉर्म शिल्लक असल्याचं दाखवून दिलं आहे. विजयानंतर संघाचा कर्णधार लोकेश राहुलने गेलचं कौतुक केलं. गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्यात बरी नव्हती, तरीही त्याच्यातली धावांची भूक कायम होती असं राहुल म्हणाला.

लोकेश राहुलनेही या सामन्यात संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. मयांक अग्रवालसोबत पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी आणि अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकत नाबाद ६१ धावा करत राहुलने आपली भूमिका चोख बजावली. अखेरच्या षटकांत RCB गोलंदाजांनी टिच्चून मारा करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. अखेरच्या चेंडूवर पंजाबला विजयासाठी १ धाव हवी असताना पूरनने चहलच्या गोलंदाजीवर षटकार लगावत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.