आयपीएलच्या तेराव्या हंगामात शारजाच्या मैदानावर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईने या सामन्यात आपला कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. रोहितच्या जागेवर कायरन पोलार्ड मुंबईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत असताना रोहितसारख्या खेळाडूचं दुखापतग्रस्त होणं मुंबई इंडियन्सला परवडणारं नाही. पंजाबविरुद्ध सुपरओव्हरच्या थरारनाट्यातही रोहित हॅमस्ट्रिंग इंज्युरीमुळे दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये मैदानात उतरला नव्हता.

मुंबई इंडियन्सने रोहितला झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर रोहित आता सावरतो आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये त्याच्या तब्येतीत सुधारणा आहे. बीसीसीआयसोबत झालेल्या चर्चेनंतर टीम मॅनेजमेंटने रोहितला चेन्नईविरुद्ध सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित शर्माच्या जागेवर मुंबईने सौरभ तिवारीला संघात स्थान दिलं आहे. कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईविरुद्ध सामना झाल्यानंतर रविवारी मुंबईचा सामना राजस्थानविरुद्ध रंगणार आहे. त्यामुळे तोपर्यंत रोहित संघात पुनरागमन करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.