न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा शांत स्वभाव आणि दमदार फलंदाजी या दोन गुणांसाठी लोकप्रिय आहे. टी२० असो, वन डे असो किंवा कसोटी… तिन्ही प्रकारांमध्ये केन विल्यमसन अतिशय जबाबदारीने खेळतो. IPLमध्येही त्याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. पण यंदाच्या IPLमध्ये हैदराबादच्या संघाने अद्याप त्याला संधी दिलेली नाही. एका संघात केवळ चार परदेशी खेळाडूंना परवानगी आहे. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यात विल्यमसनला संधी मिळाली नाही. या दोन्ही सामन्यात हैदराबादचा संघ पराभूत झाला. त्यानंतर विल्यमसनने महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं.

“मी आता एकदम तंदुरूस्त आहे. सुरूवातीला मला थोडा त्रास वाटला पण आता मात्र मी अगदी ठणठणीत आहे. मी पुढच्या सामन्यासाठी सज्ज आहे. संघ निवडताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. संघात समतोल असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे प्रत्येक खेळाडूला संघात जागा देताना विचार करावा लागेल. पण मी मात्र सामन्यासाठी आता तयार आहे”, असं विल्यमसन समालोचकांशी बोलताना म्हणाला.

“यंदाच्या स्पर्धेत सर्व सामने एकूण तीन मैदानांवर होणार आहेत. त्यामुळे खेळपट्टी कशी राहते याचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. येथील मैदाने साऱ्यांसाठीच नवीन आहेत त्यामुळे या खेळपट्ट्यांवर नीट खेळ करणं हीदेखील कसोटीच आहे. इतकंच नव्हे तर एकाच मैदानावर दोन वेगवेगळ्या सामन्यात भिन्न प्रकारच्या धावसंख्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे खेळपट्टीशी लवकर मैत्री केलेली चांगली. कारण सध्या आम्हाला क्रिकेट खेळायची संधी मिळते आहे हीच मोठी गोष्ट आहे”, असेही विल्यमसनने सांगितले.