पंजाबविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने १६० धावांच्या पार मजल मारली. अप्रतिम लयीत असणाऱ्या शिखर धवनने सलग दुसरं नाबाद शतक झळकावत दिल्लीला २० षटकांत ५ बाद १६४ धावांची मजल मारून दिली. दिल्लीचे फलंदाज एकीकडे बाद होत असताना धवनने मात्र पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि नाबाद शतक ठोकलं. या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेलने कल्याणचा गोलंदाज तुषार देशपांडे याच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.

१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या ख्रिस गेलने कल्याणच्या मराठमोळ्या तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली. तुषार ५वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकात गेलने पहिल्या दोन चेंडूंवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि पाचव्या चेंडूवर पुन्हा षटकार अशा एकूण २४ धावा लुटल्या. तर त्यानंतर १ वाइड आणि शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेतली.

पाहा ख्रिस गेलची फटकेबाजी-

त्याआधी, दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉचा बळी लवकर गमावला. एका चौकारासह ७ धावा काढून तो बाद झाला. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत दोघांनाही चांगली सुरूवात मिळाली पण त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. दोघेही वैयक्तिक १४ धावांवर माघारी परतले. मार्कस स्टॉयनीस ९ धावांवर तर शिमरॉन हेटमायरदेखील १० धावांवर बाद झाला. पण शिखर धवनने एक बाजू लावून धरली आणि अप्रतिम शतक लगावले. त्याने ६१ चेंडूत नाबाद १०६ धावांची खेळी केली. त्यात १२ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.