नवी दिल्ली : ‘आयपीएल’मध्ये पुन्हा अपयश पदरी पडले असले तरी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुच्या कर्णधारपदावर विराट कोहलीच असावा, असे मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. कोहलीला कर्णधारपदावरून हटवावे, अशी मागणी सेहवागचा सलामीचा साथीदार गौतम गंभीरने केली होती.

‘‘कर्णधार हा संघाप्रमाणेच उत्तम असावा. कोहलीने नेतृत्वाची धुरा स्वीकारल्यापासून भारताची कामगिरी चांगली होत आहे. एकदिवसीय, ट्वेन्टी-२० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारांमध्ये भारत यशस्वी ठरत आहे. मात्र बेंगळूरुचा संघ अपेक्षेनुरूप कामगिरी दाखवण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने कर्णधार बदलण्यापेक्षा समतोल संघ कसा बांधता येईल, याचा विचार करावा,’’ असे सेहवागने म्हटले आहे.