० आपली पादत्राणे कोणत्या प्रकारची आहेत (चामडय़ाची, रबराची, फॅब्रिकची, कॅनव्हासची) हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्याची काळजी घ्यावी.
० चामडय़ाची पादत्राणे असल्यास प्रथम ब्रशने त्यावरची धूळ साफ करावी. नंतर सुती कपडय़ावर लेदर क्लिनर घेऊन साफ करावे व थोडा वेळ तसेच ठेवून नंतर पॉलिश करावे. त्यामुळे चामडय़ाला कडकपणा न येता ते मऊ आणि चमकदार राहील.
० पादत्राणावर वाटरप्रूफ लिक्विडचा वापर करावा. अचानक पाऊस आल्यास ती भिजली तरी खराब होणार नाहीत.
० चप्पल, शूज, सॅण्डल पाण्यात भिजली असतील तर जुन्या कोरडय़ा कपडय़ाने पुसून घ्या आणि पंख्याखाली सुकवत ठेवा. पादत्राणे केव्हाही सूर्यप्रकाशात सुकवत ठेवू नये. त्यामुळे त्यातील मूळची आद्र्रता आणि रंग उडून जातो.
० प्रत्येक ऋतूमध्ये पावलांना आराम मिळतील अशी पादत्राणे वापरावीत. पावसाळ्यात ओपन म्हणजे स्ट्रिप असलेली, जाळी असलेली, मागे बेल्ट असलेली सॅण्डल वापरावी म्हणजे पावसाचे पाणी साचून राहणार नाही आणि मागे पट्टा असल्याने चिखलामुळे ती निसटण्याची भीतीही नाही. थंडीत बंद फुटवेअर वापरावे, त्यामुळे पायांना भेगा पडल्या असतील, तर प्रवासात जास्त ताणामुळे किंवा कुणाचा तरी पाय पडल्यामुळे त्यांना दुखापत होणार नाही, तर त्यामुळे संरक्षण मिळेल.
० लेस असलेले शूज साफ करायचे असल्यास किंवा पॉलिश करायचे असल्यास त्यांच्या लेस काढून ठेवाव्यात.
० चप्पलचा सोल झिजला असेल तर तो लावून घ्या. सोल झिजलेला असेल तर पावलांना व्यवस्थित आधार मिळत नाही. त्यामुळे पायांचे दुखणे सुरू होते.
० जुन्या चपला टाकून न देता त्या दुरुस्त करून घ्याव्यात आणि आलटूनपालटून त्याचाही वापर करावा. प्रत्येक चप्पलची बांधणी वेगळी असल्यामुळे पावलांच्या वेगवेगळ्या भागांवर त्याचा दाब पडतो. एकाच भागावर जास्त भार पडत नाही.
० कॅनव्हास किंवा फॅब्रिक शूज हाताने किंवा मशीनमध्येही साफ करता येतात. धुऊन सुकल्यावर त्यात वर्तमानपत्राचे बोळे करून भरावेत म्हणजे त्यांचा आकार बदलणार नाही.
० सोनेरी किंवा रंगीत खडे जडवलेली पादत्राणे नियमित वापरली जात नसल्याने ती कापडी पिशवीत घालून बॉक्समध्ये ठेवावीत. त्यामुळे त्याची चमक नीट राहील आणि खडेही पडणार नाहीत.
संकलन- उषा वसंत -unangare@gmail.com