राज्यातील सरकारी व अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मिळून रिक्त राहिलेल्या २६९ जागांसाठीची विशेष ऑनलाइन प्रवेश फेरी गुरुवारपासूनच सुरू करण्यात आली आहे. समुपदेशन फेरीनंतरही अभियांत्रिकीच्या तब्बल ६४ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. यापैकी सरकारी व अनुदानित महाविद्यालयांमधील २६९ रिक्त जागांकरिता ही विशेष प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. मुंबईतील व्हीजेटीआय, आयसीटी, सरदार पटेल, उषा मित्तल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या सरकारी व अनुदानित संस्थांमध्ये मिळून तब्बल ५१ जागा रिक्त राहिल्या आहेत. या शिवाय पुणे, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, जळगाव, नागपूर, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणच्या सरकारी महाविद्यालयांमध्येही काही प्रमाणात जागा रिक्त आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील तर तब्बल १४० जागा रिक्त राहिल्या आहेत.
या जागांकरिता आज, ८ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंतच विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतील. राज्याच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत नावे असलेले सर्व विद्यार्थी या प्रवेश फेरीकरीता पात्र आहेत. या जागा सर्वसाधारण म्हणून भरण्यात येतील. या करिता विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त २५ पसंतीक्रमांक देता येतील.
तसेच, ज्या संस्थांमध्ये एकही जागा रिक्त नाही तिथल्या जागांकरिताही विद्यार्थ्यांना पसंतीक्रमांक देता येतील. कारण, या फेरीत अशा संस्थांमध्येही पुन्हा काही जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंतीक्रमानुसार जागावाटप यादी ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता जाहीर केली जाईल. त्यानंतर ११ आणि १२ ऑगस्टला विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.