शालेय स्तरावर विज्ञान शिक्षणाबाबत अनास्था असल्याची ओरड सातत्याने होत असतेच. पण उच्च शिक्षणामध्येही याचे चित्र वेगळे नसल्याची बाब ‘ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशन’ (ओआरएफ)ने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. विज्ञान शिक्षण त्याच जोडीला संशोधन आणि विकास क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी भारताने भरीव काम करण्याची गरज असल्याचा सूर या अहवालात व्यक्त झाला आहे.
‘ओआरएफ’तर्फे विज्ञान विषयातील उच्च शिक्षणाचा आढावा घेणारा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासाचे संकलन ‘व्हीदर सायन्स एज्युकेशन इन इंडियन कॉलेजेस?’ पुस्तकात करण्यात आले आहे. यामध्ये देशात संशोधन आणि विकासाच्या कामात जगातील इतर सर्व देशांच्या तुलनेत खूप कमी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ ०.८ टक्केच गुंतवणूक केली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याचबरोबर विज्ञान शिक्षणासाठी आवश्यक ती सामुग्री तसेच प्रशिक्षित शिक्षक नसल्याची बाबही समोर आली आहे. देशातील अनेक महाविद्यालयांच्या प्रयोगशाळांमध्ये पुरेशी सुरक्षा उपाययोजना नसल्याचे धक्कादायक चित्र या अभ्यासादरम्यान समोर आले आहे. इतकेच नव्हे तर २०२५ पर्यंत वर्षांला ३० हजार पीएच.डी.धारक तयार करण्याचा मानस असलेल्या भारताची वाटचाल खूप धीम्या गतीने सुरू असून सध्या देशात वर्षांला केवळ ८२८६ पीएच.डी.धारक होत असल्याचेही यामध्ये निर्दशनास आले आहे. हा अभ्यास करून केवळ टीका करण्यात आली नसून सद्यस्थिती सोप्या पद्धतीने कशी बदलता येईल यासाठी काही सूचनाही यामध्ये करण्यात आल्या आहेत. या अहवालाचे प्रकाशन सोमवारी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. सी. एन. आर. राव यांच्या हस्ते होणार आहे. देशातील विज्ञान शिक्षणाची आणि संशोधनाची स्थिती सुधारण्यासाठी ‘ओआरएफ’तर्फे देशभरात विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या चर्चासत्राची सुरुवात सोमावारी संध्याकाळी डॉ. राव यांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी दिली. या चर्चासत्रांच्या माध्यमातून विज्ञान शिक्षण तसेच संशोधनाबाबचा एक आराखडा तयार करण्यात येणार असून तो आराखडा जानेवारी २०१५मध्ये मुंबईत होणाऱ्या ‘सायन्स काँग्रेस’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुपूर्द करण्यात येणार असल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.