17 December 2017

News Flash

दृक्-श्राव्य अध्ययनावर भर

मराठवाडय़ातील नांदेड जिल्ह्य़ातील देगलूर येथील ‘मानव्य विकास विद्यालय’ ही शाळा या परिसरातील नामवंत शाळांपैकी

शिवानंद स्वामी - सहशिक्षक , मानव्य विकास विद्यालय, देगलूर, नांदेड. onlineshiva44@gmail.com | Updated: January 6, 2013 12:02 PM

मराठवाडय़ातील नांदेड जिल्ह्य़ातील देगलूर येथील ‘मानव्य विकास विद्यालय’ ही शाळा या परिसरातील नामवंत शाळांपैकी एक समजली जाते. शाळेत शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी अभ्यासपूरक उपक्रम राबविले जातात. विविध स्पर्धा परीक्षा, सामान्यज्ञान परीक्षा, क्रीडा स्पर्धा असतील किंवा समाजाभिमुख उपक्रम असतील, त्यात शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त असतो.
एका छोटय़ाशा गावातील ही भौतिक सुविधांनी परिपूर्ण शाळा पाहून अनेक जण भारावून जातात. भव्य क्रीडांगण, मोठय़ा व हवेशीर वर्गखोल्या आणि राष्ट्रीय हरित विभागाच्या मदतीने सर्वत्र प्रयत्नपूर्वक तयार केलेली हिरवळ शाळेच्या सौंदर्यात भर टाकते. शाळा स्वच्छ राहण्यासाठी मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे.
शाळेत पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. यात १ हजार ३५० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये शहराबरोबरच खेडय़ापाडय़ातील मुला-मुलींची संख्या लक्षणीय आहे. शाळेला लाभलेले मुख्याध्यापक संतोष कोल्हे यांचा शाळेच्या गुणात्मक विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सुलभ व परिणामकारक करण्याकडे कल असतो. त्यासाठी शाळेच्या सर्व २० वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्गातील अध्ययन व अध्यापन प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवता येते.
याशिवाय ‘डिजिटल क्लासरूम’ची संकल्पना विद्यार्थ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरली आहे. कारण दृकश्राव्य माध्यमातून केलेले अध्यापन विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहते. यामुळे विद्यार्थ्यांना जादा पसे मोजून खाजगी शिकवणी लावण्याची गरज राहिली नाही. प्रभावी अध्यापन प्रक्रियेने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडली आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम सत्रापासूनच प्रत्येक विषयाची आठवडी चाचणी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा भरपूर सराव होऊन त्यांच्या मनातील ‘परीक्षेची भीती’ नाहीशी होण्यास मदत होते. या उपक्रमामुळे विद्यार्थी व त्यांचे पालक समाधानी झाले आहेत. इतकेच नव्हे तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षांअखेरीस संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सामान्यज्ञान परीक्षा घेऊन त्यात प्रथम व द्वितीय येणाऱ्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
शाळेत ‘राष्ट्रीय हरित सेना’ विभागाच्या वतीने शाळेच्या मोकळ्या परिसरात जवळपास एक हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. यासाठी संस्थेकडून ठिबक सिंचनाची सुविधा पुरविण्यात आली. आज ती झाडे १५ ते २० फूट उंचीची झाली आहेत. शाळेत प्रवेश करताच शाळेतील रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे व हिरवळीने मन मोहून जाते. हरित सेनेचे पर्यावरणपूरक काम पाहून सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने २००७-०८ साली तालुक्यातील ‘त्रितारांकित शाळा’ व २००८-०९ साली संपूर्ण जिल्ह्य़ातून ‘पंचतारांकित शाळा’ म्हणून निवड करून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हरित सेना विभागाकडून केलेल्या उल्लेखनीय कामाची नोंद घेत राष्ट्रीय वनऔषधी मंडळाने २०१० मध्ये महाराष्ट्रातील फरक्त १०० शाळांची निवड हर्बल गार्डन निर्मितीसाठी केली. त्यापकी मानव्य विकास विद्यालय एक आहे. त्यामुळे शाळेचे कार्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. अशा रीतीने विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी झटणाऱ्या शाळेत कार्य करताना आम्हाला निश्चितच आनंद मिळतो.

First Published on January 6, 2013 12:02 pm

Web Title: manav vikas vidyalaya