मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. वसतिगृहांकरिता यंदा ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. २५ जुलैपासूनच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. परंतु, ५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीचे संकेतस्थळ कामच करीत नव्हते. अर्ज भरण्याची शेवटची मुदत १५ जुलै आहे. त्यामुळे, ही मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेने केली आहे. 9या प्रवेशांची जबाबदारी असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रत्येक २० विद्यार्थ्यांमागे एक संगणक असे ८ संगणक महाराष्ट्रातील प्रत्येक वसतीगृहासाठी म्हणून खरेदी करण्यात आले. परंतु, या संगणकांना इंटरनेट सुविधा पुरविण्यात आली नव्हती. त्यातले काही संगणक खराब झाले. आता ते नुसते पडून आहेत. वसतीगृह कार्यालयातच इंटरनेट सुविधा नाही. त्यातून २४ जूनपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरू झाले. परंतु, संकेतस्थळच ‘ऑफलाइन’ झाल्याने विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत. हे संकेतस्थळ ५ जुलैला कार्यरत झाले. त्यामुळे, अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी प्रहारचे मनोज टेकाडे यांनी केली आहे. तसेच, शक्य असल्यास सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज करण्याचा पर्याय खुला ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.