मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांमध्ये सध्या सुरू असलेला सावळागोंधळ शनिवारीही कायम राहिला. एम. ए.ला (द्वितीय वर्ष) तत्त्वज्ञान विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने घातलेल्या वेगळ्याच गोंधळाचा सामना करावा लागला. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत काही प्रश्नांसमोर गुणच लिहिले नसल्याने कोणत्या प्रश्नाला किती महत्त्व द्यायचे आणि त्या प्रश्नाचे उत्तर नेमके किती लिहायचे, या संभ्रमात विद्यार्थ्यांचा तब्बल दीड तास वाया गेल्यानंतर विद्यापीठाला जाग आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या परीक्षेत १२.३० नंतर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांना गुणांचे ‘वजन’ लाभले.
शनिवारी दुपारी तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या २०० विद्यार्थ्यांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागले. सकाळी ११ वाजता विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्यातील प्रत्येक प्रश्न किती गुणांसाठी आहे, हे छापले नव्हते. ‘टिपा लिहा’ यासारखे काही प्रश्न १० गुणांसाठी, तर काही मोठे प्रश्न २५ गुणांसाठी असतात. मात्र कोणता प्रश्न किती गुणांसाठी आहे, हे न समजल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
केंद्रांवरील संचालकांनी ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आणून देऊन विद्यापीठाला आपली चूक उमगेपर्यंत १२ वाजले. त्यानंतर विद्यापीठाने प्रत्येक केंद्रावर संपर्क करत प्रश्नपत्रिकेत सुधारणा केली. मात्र तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी अध्र्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे लिहिली होती.
‘विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले नाही’
तत्त्वज्ञान विषयाच्या या प्रश्नपत्रिकेत गोंधळ झाला होता. मात्र विद्यापीठाला ही चूक लक्षात आल्यानंतर आम्ही तातडीने कार्यवाही केली. प्रत्येक केंद्रावर तातडीने याबाबतच्या सूचना पाठवून आम्ही प्रश्नपत्रिकेतील ही चूक सुधारली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे काहीही नुकसान झालेले नाही.
    – नरेशचंद्र (प्रकुलगुरू)