‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांमध्ये जोरदार चुरस लागत असली तरी भारतात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या या संस्थांची कामगिरी तिच्या परदेशातील प्रतिस्पध्र्याच्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत कमालीची घसरली आहे. त्यातही मुंबईच्या आयआयटीची घसरण अधिकच लक्षणीय आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या २०१३च्या क्यूएस क्रमवारीत पहिल्या २०० शिक्षण संस्थांमध्ये भारतातील एकही संस्था नाही. मात्र क्यूएस क्रमवारी सुरू झाली तेव्हा हे चित्र नव्हते. पाच वर्षांपूर्वी ही क्रमवारी सुरू झाली तेव्हा मुंबई आणि दिल्ली आयआयटी पहिल्या २००च्या यादीत होत्या. पण, पहिल्या २००मध्ये आयआयटी असणे आता इतिहासजमा झाले आहे. भारतीय संस्थांची क्यूएस क्रमवारीतील कामगिरी इतर संस्थांच्या तुलनेत कमालीची घसरू लागली
आहे.
२००९मध्ये मुंबई-आयआयटी क्यूएस क्रमवारीत १६३व्या स्थानावर होती, तर दिल्ली आयआयटी १८१व्या. पण, आता या दोन्ही संस्था पहिल्या २००मध्येही राहिल्या नाहीत. २०१०मध्ये मुंबई-आयआयटी १८७व्या स्थानावर घसरली तर दिल्ली-आयआयटी २०२वर. घसरण्याच्या या स्पर्धेत त्या पुढील वर्षी मुंबई-आयआयटी दिल्लीला मागे टाकत २२५व्या स्थानावर आली. त्यावर्षी दिल्लीला २१८वे स्थान मिळाले. दिल्लीने २०१२मध्ये थोडीफार सुधारणा करत २१२वे स्थान मिळविले. पण मुंबई-आयआयटीला हे सावरणे काही जमले नाही. इतर आयआयटी आणि विद्यापीठांची परिस्थितीही थोडय़ाफार फरकाने अशीच आहे. (पाहा चौकट)
यंदा क्यूएसच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या ४००मध्ये भारताच्या पाच आयआयटी वगळता एकही संस्था नाही, तर आशियाई संस्थांकरिता स्वतंत्रपणे केलेल्या क्रमवारीतही हीच स्थिती आहे. या क्रमवारीतही सर्वच संस्थांची कामगिरी २०१२च्या तुलनेत घसरते आहे. भारताच्या पाचही मोठय़ा आयआयटी याला अपवाद नाहीत. आयआयटी-दिल्ली या क्रमवारीत ३८व्या (गेल्या वर्षी ३६) स्थानावर घसरली, तर मुंबई-आयआयटी ३९व्या (३४), आयआयटी-मद्रास ५१व्या (४७), आयआयआयटी-खरगपूर ५८ (५६) आणि आयआयटी-रूरकी ६६(६५) यांचीही घसरणच
झाली.
तज्ज्ञांच्या मते आयआयटीने संशोधन लेखांच्या वाढीवर भर दिला. मात्र, त्यांची बक्षिसे किंवा इतर माध्यमातून फारशी दखल घेतली गेलेली नाही. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत कमी असलेली शिक्षक संख्या हे देखील महत्त्वाचे कारण आहे. त्यातून आयआयटी पदव्युत्तर शिक्षणाच्या विकासावर फारसा भर देत नाही, असाही एक आक्षेप आहेच. परदेशातील विकासावरही आयआयटी फारसा भर देत नाही. त्यामुळे, यात आघाडीवर असलेल्या चीन, सिंगापूर, कोरिया येथील संस्थांना विद्यार्थ्यांची पसंती मिळते. भारताच्या शैक्षणिक धोरणांचा भर प्रसार आणि पायाभूत सुविधा वाढविण्यावर असल्यानेही क्यूएसच्या क्रमवारीत भारतीय संस्था मागे पडतात.

आयआयटी-दिल्ली या क्रमवारीत ३८व्या (गेल्या वर्षी ३६) स्थानावर घसरली, तर मुंबई-आयआयटी ३९व्या (३४), आयआयटी-मद्रास ५१व्या (४७), आयआयआयटी-खरगपूर ५८ (५६) आणि आयआयटी-रूरकी ६६(६५) यांचीही घसरणच झाली.