इतर मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून यंदा ‘जेईई’ या सामाईक प्रवेश परीक्षेत तब्बल ५० टक्के विद्यार्थी राखीव जागांवरील प्रवेशांसाठी आपले नशीब आजमावणार आहेत. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’सह (आयआयटी) इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशाकरिता ही परीक्षा होणार आहे.
६ एप्रिल, २०१४ मध्ये ‘जेईई’ची मुख्य (मेन्स) परीक्षा होणार आहे. याकरिता देशभरातून १३ लाख ५७ हजार विद्यार्थी बसले आहेत. यापैकी ६ लाख ९० हजार विद्यार्थी खुल्या वर्गातून परीक्षा देत आहेत. त्याखालोखाल ४ लाख ७० हजार विद्यार्थी इतर मागासवर्गीय वर्गातील असून १ लाख ३६ हजार अनुसूचित जाती व ५६ हजार विद्यार्थी हे अनुसूचित जमातीतून असणार आहेत. यानुसार तब्बल ६ लाख ७० हजार विद्यार्थी राखीव प्रवर्गातून ‘जेईई’त आपले नशीब आजमावणार आहेत. हे प्रमाण खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांएवढेच आहे हे विशेष.
गेली वर्षांनुवर्षे खुल्या वर्गातील परीक्षार्थीचे प्रमाण ‘जेईई’त खूप जास्त राहिले आहे. परंतु, गेल्या तीन वर्षांत ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असून एकूणच राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांएवढी झाली आहे. २०११मध्ये एकूण परीक्षार्थीच्या केवळ २० टक्के विद्यार्थी हे राखीव प्रवर्गातील होते. यंदा हे प्रमाण ३५ टक्क्य़ांवर गेले आहे. यामुळे, राखीव प्रवर्गातील प्रवेशासाठीची चुरसही वाढणार आहे.