परिस्थितीच्या रेटय़ामुळे शिक्षणात खंड पडलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून थेट पीएच. डी करण्यापर्यंतची संधी मिळवून देणारी योजना वर्षभरात कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमात दिली. ज्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधक किंवा वैज्ञानिक बनण्याची क्षमता आहे, अशा विद्यार्थ्यांना नववी आणि अकरावीच्या स्तरावरच हेरून त्यांची विशेष प्रशिक्षणासाठी निवड करण्याची योजना असल्याचे इराणी यांनी सांगितले.
मला आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सोडून नोकरीचा मार्ग पत्करावा लागला होता. अनेक महिला, आदिवासी व मागास विद्यार्थ्यांना परिस्थितीपुढे झुकून शिक्षण अध्र्यावर सोडावे लागते. अशांना फक्त शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा तसेच त्यांना संशोधनापर्यंतची संधी उपलब्ध करून देण्याचा विचार आहे, असे इराणी यांनी सांगितले. चेंबूरमधील ‘विवेकानंद एज्युकेशन सोसायटी’च्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संस्थेचे सचिव अमर असरानी उपस्थित होते.
ज्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधक किंवा वैज्ञानिक बनण्याची क्षमता आहे, अशा विद्यार्थ्यांना नववी आणि अकरावीच्या स्तरावरच हेरून त्यांची विशेष प्रशिक्षणासाठी निवड करण्याची योजना असल्याचे इराणी यांनी सांगितले. ‘इशान विकास’ नामक या कार्यक्रमाअंतर्गत अशा विद्यार्थ्यांचे दोन गट करून त्यांना आयआयटी-आयआयएम या देशातील अग्रगण्य संस्थांच्या संपर्कात आणले जाणार आहे. त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केले जाईल, अशी या कार्यक्रमाची माहिती देताना त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने संस्थेने सुरू केलेल्या ‘युवा फॉर सेवा’ उपक्रमाचीही त्यांनी यावेळी प्रशंसा केली. ‘शाळा दर्पण’ योजनेद्वारे मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपासून त्याच्या शैक्षणिक विकासवर लक्ष ठेवता येणे शक्य होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
आयआयटी-जेईई तीन वेळा?
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) प्रवेशाकरिता घेण्यात येणारी ‘जेईई’ ही परीक्षा तीन वेळा देण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबतचा विचार सुरू असल्याचे इराणी यांनी यावेळी सांगितले. आता ही परीक्षा दोन वेळा देता येते. ही संधी एकाने वाढविण्यात आल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
कर्ण-बधीर विद्यार्थ्यांशी संवाद
संस्थेच्या कर्ण-बधीर विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान खुणांच्या भाषेत राष्ट्रगीताचे सादरीकरण केले. व्यवसायाने अभिनेत्री असलेल्या इराणी यांनीही मुलांसमवेत हावभाव करत राष्ट्रगीत सादर करण्याचा मोह आवरला नाही. या मुलांसमवेत ‘ए’ ते ‘झेड’पर्यंतच्या खुणा सादर करून त्यांनी उपस्थितांना थक्कही केले.