वाढत्या तुरडाळ दराची दखल घेत केलेल्या कारवाईबाबत अदानी विल्मर लिमिटेड व गोल्डन व्हॅली अँग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्यासमोर होऊन अदानी विल्मर लिमिटेड, इचलकरंतील बिग बझार दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून जप्त केलेल्या वस्तूंची विक्री खुली करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला असून दिवाळीनंतर तरी स्वस्तात डाळ मिळणार का, याची ग्राहकांना प्रतीक्षा आहे.
खाद्यतेल, डाळ आणि खाद्यतेल बियांचा मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा असल्याच्या संशयावरून जिल्हा पुरवठा विभागाने गेल्या महिन्यात टाकलेल्या अदानी विल्मर लिमिटेड, बिग बझार यांच्यासह काही ठिकाणी छापे टाकले होते. संबंधित खाद्यतेलाचा साठा अनुज्ञप्ती मर्यादेपेक्षा अतिरिक्त होता. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी संबंधित कंपन्यांचे गोदाम सील करण्यासह खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतला होता. या कंपन्यांवर ‘जीवनावशयक वस्तू अधिनियम कलम ७’ अन्वये फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
गोल्डन व्हॅली अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडने मर्यादेत साठा केल्याचे समोर आले. त्यामुळे या कंपनीला निर्दोष ठरविले आहे. दोषी ठरलेल्या कंपन्या व दुकान यांच्याकडील जप्त केलेला साठा न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून बँक गॅरंटी व इंडेम्निटी बाँडवर विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे.
उजळाईवाडी येथील अदानी विल्मर लिमिटेड, इचलकरंतील बिग बझार या कंपन्यांकडून कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांना खाद्यतेल, बेसन, वनस्पती तेल आणि तांदळाची विक्री केली जाते. या कंपन्यांचे दोन परवाने आहेत. त्याअंतर्गत त्यांना खाद्यतेलाचा एकत्रितपणे ६०० िक्वटलपर्यंत साठा करता येत असताना तेथे ११८६.४२ िक्वटल इतका खाद्यतेलाचा साठा आढळल्याने नियमाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.