शेतकऱ्यांनी ‘लाँगमार्च’ काढल्यानंतर राज्य सरकारने लेखी आश्वासनांची खैरात केली.  मात्र, त्याची पूर्तता करण्याबाबत शासनाने पावले उचललेली नाहीत. शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत आपला शब्द पाळण्याचा शहाणपणा सरकारने दाखवावा, अन्यथा १ जूनपासून शेतकरी संपावर जातील, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी येथे दिला. अखिल भारतीय किसान सभेच्या कोल्हापूर जिल्हा समितीच्या वतीने आयोजित शेतकऱ्यांचा विजयी मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांनी केलेला संप आणि पाठोपाठ नाशिक ते मुंबई लॉँग मार्च काढल्याने सरकारने लेखी आश्वासन दिले. १० पैकी ६ मागण्या मान्य करत शासनाने अध्यादेशही काढले असले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही.