कोल्हापूर  : दुचाकीवरून येऊ न पादचारी महिलांच्या गळयातील दागिने पळवून नेणाऱ्या सांगली जिल्ह्य़ातील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली. निकेश उर्फ बबलु वडार (२३, नेर्ले), सचिन श्रीकांत हिंगणे (२९,रा.बांबवडे, ) आणि सुनील मोहन रणखांबे (२२,रा. नेर्ले, तिघे ता.वाळवा) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडून २५ सोनसाखळी आणि २ घरफोडी असे एकू ण २७ गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्य़ातील ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोटरसायकली असा एकूण १८ लाख ९० हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते.

शहर आणि आसपासच्या परिसरात पादचारी  महिलांचे मंगळसूत्र तसेच दागिने दुचाकीवरुन येऊन हिसडा मारुन चोरी करण्याचे प्रकार झाले आहेत. अशा चोरीच्या टोळीची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणशाखेच्या पथकातील पो. काँस्टेबल संतोष माने यांना मिळाल्यानंतर येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेल परिसरात बबलू वडार याला २१ जून रोजी ताब्यात घेण्यात आले होते. अधिक चौकशीत शाहुपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे कबुली त्याने दिली.

त्याने साथीदार सचिन हिंगणे आणि सुनील रणखांबे यांच्या मदतीने त्यांच्या दुचाकीवरुन शहर आणि परिसरात गेल्या वर्षी हिसडा मारुन सोन्याचे दागिने चोरण्याचे बारा गुन्हे केले आहेत. त्या दागिन्यांच्या विक्रीतून आलेले पैसे वाटून घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी सुनील रनखांबे याला अटक करुन गुन्ह्य़ात वापरलेल्या दोन दुचाकीही ताब्यात घेतल्या. या तिघांनी यावर्षी अशा प्रकारे तेरा गुन्हे केल्याचेही उघडकीस आले.