गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष करीत शनिवारी लाडक्या बाप्पाला घरोघरी निरोप देण्यात आला. श्रींच्या विसर्जनासाठी पंचगंगा घाट, तांबट कमान, इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, बापट कॅम्प येथे भाविकांची गर्दी उसळली होती. अनेक भाविकांनी गणेशमूर्ती व निर्माल्याचे दान केले. महापालिका प्रशासनाने विसर्जनाची चांगली सोय केली होती तर पोलीस बंदोबस्तही तनात करण्यात आला होता.

मंगलमूर्तीचे आगमन झाल्यापासून घरोघरी आनंदोत्सव सुरू होता. गणरायापाठोपाठ गौरीची प्रतिष्ठापनाही विधिवत करण्यात आली. आज मात्र लाडक्या बाप्पाना निरोप देण्याची वेळ आली.पाचव्या दिवशी घरगुती गणपतीचे विसर्जन मोठय़ा प्रमाणात केले जाते. सहकुटुंब जलाशया स्थळी श्री विसर्जन करण्यासाठी जात असल्याने नदीकडे जाणारी वाहने मोठय़ा संख्येने दिसत होती. वाहनांची संख्या वाढल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत होता. पण वाहतूक विभागाच्या पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केले होते. विसर्जनासाठी पंचगंगा घाटावर भाविकांची सर्वाधिक गर्दी होती. इतर ठिकाणीही श्रींचे विसर्जन करण्यात आले. काही भाविकांनी विहिरीमध्ये विसर्जन केले.

प्रशासनाच्यावतीने विसर्जनाची उत्तम तयारी करण्यात आली होती. कालपासूनच प्रशासन विसर्जनासाठी सज्ज झाले होते.

महापालिकेच्या पवडी विभागातील दोनशे कर्मचारी, आरोग्य विभागाचे तीनशे कर्मचारी, चाळीस ट्रॅक्टर, दहा डंपर, चार जेसीबी अशी यंत्रना तनात केली होती. अग्निशमन विभागाचे जवान सूरक्षिततेच्या साधनांसह सज्ज होते. रात्रीच्या वेळी गरसोय होऊ नये यासाठी पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात आली होती. याचा भाविकांना चांगला लाभ झाला.

जागोजागी गणेशमूर्ती व निर्माल्य दान करण्याबाबत फलक लावण्यात आले हेते. त्यामुळे श्रीमूर्ती विसर्जन करणाऱ्या भाविकांना याबाबतचे योग्य मार्गदर्शन झाले. मूर्ती दान करा, नदीचे प्रदूषण वाचवा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जात होते. मूर्तिदान करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कुंड ठेवण्यात आले होते. निर्माल्य गोळा करण्यासाठी आठरा पथक कार्यरत होते. तर एक पथक केवळ प्लास्टीक कचरा गोळा करीत होते.

संकलित करण्यात आलेले निर्माल्य हे अवनी व एकटी या सेवाभावी संस्थांना खत करण्यासाठी देण्यात येणार आहे. तर, हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पंचगंगा घाटावर मूर्ती दान करू नका, वाहत्या पाण्यात विसर्जित करा, असे आवाहन केले जात होते.