कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शनाने झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोन्ही उमेदवाराच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. हातकणंगले मतदारसंघातील सतेज पाटील सरूडकर, राजू शेट्टी यांच्यासह सर्व उमेदवारांनी इचलकरंजी शहराला प्रचाराचा केंद्रबिंदू बनवले होते. आता छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.
आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सुपर संडेची संधी साधून सकाळपासूनच वातावरण ढवळून निघाले होते. कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या प्रचाराच्या सांगता रॅलीत मुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते. मी कोल्हापुरात तळ ठोकून राहिल्याने संजय मंडलिक, धैर्यशील माने हे दोघेही विजयी होतील. माझ्या उपस्थित राहण्याने विरोधकांच्या पोटात गोळा का आला आहे, असा प्रतिप्रश्न शिंदे यांनी केला.
हेही वाचा – कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाची टाकी स्वच्छ करताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तिघेजण जखमी
दरम्यान शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी स्थानिक पातळीवर गाठीभेटी, वैयक्तिक संपर्क यावर भर देण्यात आला. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी अखेरच्या दिवशी कोल्हापुरात उपस्थित राहून प्रचार यंत्रणा अखेरच्या टप्प्यामध्ये गतिमान करण्यावर भर दिला.
उन्हात इचलकरंजी तापली
भर उन्हातही इचलकरंजी शहरात प्रचाराचा धडाका उडाला होता. मुख्यमंत्री शिंदे इचलकरंजी खासदार माने यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेल्या दुचाकी रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. ठाकरे सेनेचे सत्यजित पाटील सरूडकर यांच्या मिरवणुकीत महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराची सांगता केली.