कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बाजी मारली असली तरी अंतर्गत गटबाजी पक्षनिरीक्षकांसमवेत मंगळवारी झालेल्या जिल्हा काँग्रेसमधील बठकीत उफाळून आली. पक्ष विरोधी भूमिका घेणारे आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत नूतन नगरसेवकांनी पक्षनिरीक्षक पतंगराव कदम यांना भंडावून सोडले. माजी मंत्री सतेज पाटील बोलत असताना आक्रमक होत नगरसेवकांनी ही मागणी केल्याने यावेळी कदम यांनी लवकरच महाडिकांवर कारवाई करण्याची ग्वाही दिली.
एकाकी झुंज देत माजी मंत्री सतेज पाटील यांनी महाडिक विरोधात असतानाही काँग्रेसकडे सत्ता खेचून आणली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये नूतन सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी पाटील यांचे भाषण सुरु असताना नूतन नगरसेवकांनी पक्षनिरीक्षक कदम यांच्याकडे महाडिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या दहा वर्षांपासून महाडिक यांच्यावर कारवाईस पक्षाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप संदीप नेजदार यांनी केला. तर महाडिक यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे आढळून आल्यास पक्षविरोधी कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
यामुळे वाद संपला नाही. उलट नगरसेवक दिलीप पोवार यांनी कनाननगर प्रभागात माझ्याविरोधात निवडणुकीला उभे राहणारे सुनील मोदी कोणाचे समर्थक आहेत, हे तपासून घेण्याची मागणी करत त्यांच्या उमेदवारीमुळे मला किती त्रास झाला आहे, असे म्हणत त्रागा व्यक्त केला. काँग्रेस पक्षाच्या २६ उमेदवारांच्या विरोधात महाडिक यांनी प्रचार केल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. अखेर कदम यांनी योग्य तक्रारीची दाखल घेऊन कारवाई करण्याची ग्वाही दिल्यानंतर वाद संपुष्टात आला.