महाराष्ट्राने कृतिशील खंबीर साथ देण्याची मागणी

कोल्हापूर :  बेळगावसह सीमाभागात रविवारी ‘काळा दिन’ गांभीर्याने पाळण्यात आला. मराठी भाषकांनी व्यवहार बंद पाळून कर्नाटक शासनाचा आणि त्यांच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. ‘सीमा भागातील मराठी जनतेला महाराष्ट्राकडून केवळ आश्वासन नको तर, कृतिशील खंबीर पाठिंबा हवा’, असे परखड मत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केले.

१ नोव्हेंबर रोजी बेळगावसह मोठा भूभाग कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ दरवर्षी याच दिवशी काळा दिन साजरा केला जातो. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या लढय़ातील काळा दिनावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न केले होते.

आंदोलनाला प्रतिसाद

करोनाचे नियम पाळून आज बेळगाव आणि सीमाभागात मराठी जनतेने काळा दिन गांभीर्याने पाळला. आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळला. बेळगाव येथील मराठा मंदिरमध्ये एकीकरण समितीच्यावतीने आयोजित धरणे आंदोलनाला कार्यकर्त्यांंनी लक्षणीय उपस्थिती दर्शविली. मध्यवर्ती समितीचे सचिव मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी यांच्यासह कार्यकर्त्यांंनीही विचार मांडले.

पुढील काळात मराठी भाषकांनी एकीकरण समितीच्या ध्वजाखाली एकदिलाने सीमालढा प्रकर्षांने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. केंद्र आणि कर्नाटक सरकारच्या अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांसह ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे’अशा घोषणा देण्यात आल्या.

पोलिसांची दडपशाही

आजच्या धरणे आंदोलनाचा धसका पोलीस प्रशासनाने घेतलेला पाहायला मिळाला. आंदोलन स्थळाकडे जाणारे रस्ते चोहोबाजूंनी पोलिसांनी रोखले होते. काळ्या-पिवळ्या झेंडय़ांना पोलिसांनी रोखल्याने तणाव निर्माण झाला होता.